गोव्याच्या ट्रीपसाठी ‘त्या’ पोलिसाने 4 लाख मोजले, चांडाळ चौकडी पत्रकारांनी अधिकाऱ्यांनाही घेरले, खास उपायुक्तांचे कनेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली तब्बल 25 लाखांचा मलिदा चाखणाऱ्या काही तथाकथित पत्रकारांनी आपली हवस पूर्ण करण्यासाठी चक्क एका पोलीस अंमदारालाच नेमल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यालाही थेट भारतीय पोलीस सेवेतून आलेल्या मोठय़ा पोलीस उपायुक्तांचा वरदहस्त मिळाला आहे. संबंधित चांडाळ चौकडींसाठी पब-हॉटेलमध्ये सेटिंग करणे, आठवडय़ाला दारूपाटर्य़ाची तजवीज करणे, मसाज पार्लरसह गोव्यात ट्रीप आयोजित करून लाड पुरविण्यासाठी संबंधित पोलीस अमलदाराने तब्बल 4 लाख रुपये खर्च केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पूर्वी खडक आणि आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरदहस्त लाभलेल्या पोलीस उपायुक्तांच्या नावाने मोठी वसुली तो करीत आहे.

स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली वेश्या व्यावसायिक महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱया रोहन कदम याच्याविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. संबंधित महिलेने जबाबामध्ये आरोपी रोहन कदम याच्यासह इतर तीन लोक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पोलिसांना यातील अनोळखी तीन लोकांचा शोध घ्यावा लागणार आहे. ते लोक नेमके कोण होते, याचीही चौकशी करताना पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे.

हाच तो टेंगणा पोलीस अंमलदार

खडक पोलीस ठाण्यात वसुलीला कार्यरत असताना संबंधित टेंगण्या अंमलदाराने लाखोंची माया गोळा केली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पेशल 64 वसुली बहाद्दरांची विविध पोलीस ठाण्यात बदली केली. त्यामध्ये संबंधित टेंगणा वसुलीदार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत झाला. त्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियासह काही वेबपोर्टलच्या सुपारीबाज पत्रकारांना हाताशी धरले. काही महिन्यांपासून त्याने एका भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱयाच्या नावाने वसुलीला सुरुवात केली आहे. त्यातील पैशांतूनच त्याने संबंधित चौकडींची गोवा ट्रीप आयोजित केली होती. त्यासाठी तब्बल 4 लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच बंडगार्डनच्या हद्दीत विविध पब-हॉटेलमध्ये दर आठवडय़ाला चांडाळ चौकडींसाठी पार्ट्या आयोजित करणे, कोरेगाव पार्कमध्ये मसाजची सोय केली जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार या टेंगण्याविरुद्ध कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.