
चंद्रपुरातील एका अपार्टमेंटमध्ये तब्बल 91 लाखांच्या बनावट नोटांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम दिनेश नागर (26) याला अटक केली असून घटनास्थळावरुन कलर प्रिंटर, 500 रुपयांच्या बनावट नोटा व साहित्य जप्त केले आहे.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर परिसरात राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 203 मध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून धाड टाकली. परंतु, फ्लॅटला कुलूप लावले होते. पोलिसांनी फ्लॅटचे लॉक तोडले असता बेडरूममध्ये 10 पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये हिंदुस्थानी चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या 500 च्या रंगीत छायांकित नोटा होत्या. यासोबतच एक कलर प्रिंटर आणि इतर साहित्य असा एकूण 91 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपी अटक केली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोले करीत आहे.































































