मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’साठी बेरोजगार भावांची मिंधेगिरी करणार्या पोलीस आयुक्तांनी परवड केली. पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी फर्मान काढून कारागृह पोलीस भरतीच रद्द केली. ऐनवेळी भरती रद्द झाल्याने बेरोजगारांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, या बेरोजगारांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी परिवहन मंडळाच्या तब्बल 500 पेक्षा जास्त बसेस महिलांना आणण्यासाठी जुंपण्यात आल्या. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा दौरा आठवडाभर अगोदरच ठरलेला होता. त्यानुसार नियोजन करताना कारागृह पोलीस भरतीही लक्षात घ्यायला हवी होती, परंतु पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मिंधेगिरी करण्यासाठी भरतीसाठी आलेल्या बेरोजगारांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. भरतीच्या दिवशी सकाळीच म्हणजेच आज नोटीस लावून भरती रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा दौरा आठ दिवसांपूर्वीच ठरला होता. पोलीस भरतीची तारीखही निश्चित होती. भरतीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून बेरोजगार आले होते. किमान तीन दिवस अगोदर भरती रद्द होणार, पुढे ढकलणार याची माहिती देणे अपेक्षित होते. परंतु मुख्यमंत्र्यांची मिंधेगिरी करणार्या पोलीस आयुक्तांनी बेरोजगारांचे हाल केले. या उमेदवारांना साधे पाणीही कुणी विचारले नाही.
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमासाठी ऐनवेळी पोलीस भरती रद्द करण्यात आली. बेरोजगारांची पोलीस आयुक्तांनी हेळसांड केली. पुन्हा भरती कधी होणार याची साधी माहिती देण्याचे सौजन्यही दाखवण्यात आले नाही. बेरोजगारांची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात त्यांची प्रचंड परवड झाली.
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते