
भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मदत करण्यासाठी आठ हजारांची लाच घेणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षक संतोष वसंत राऊत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे या लाचखोर अधिकाऱ्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातच मंगळवारी रात्री दहा वाजता ही लाच स्वीकारली. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून रुबाबात फिरला, तेथील कोठडीतच त्याला रात्र काढावी लागली.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष वसंत राऊत (43, रा. मौर्या पार्क 2, हर्सल) यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात भावाला मदत करण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने संतोष राऊत यांची भेट घेतली. यावेळी मदत करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 7ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. दरम्यान, तक्रारदार आणि आरोपीमध्ये तडजोड होऊन लाचेची रक्कम 8 हजार ठरली. ती स्वीकारताच संतोष राऊत याला एसीबी पथकाने पकडले. आरोपीच्या अंगझडतीतून लाच रक्कम मिळून आली असून त्याचा मोबाईल फोन जप्त करून विश्लेषण सुरू आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती देखील घेण्यात आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, वाल्मिक कोरे, पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, प्रकाश डोंगरदिवे, सी.एन. बागूल यांच्या पथकाने केली.
लाचखोर पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत याला आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी आरोपी संतोष राऊत याने तक्रारदाराव्यतिरिक्त आणखी कोणाकडून लाच घेतली आहे का, गुन्ह्यात आणखी कोणाचा समावेश आहे का, यासह आरोपीच्या मोबाइलची तपासणी बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी आरोपीला गुरुवारपर्यंत कोठडी सुनावली.