छत्रपती शिवरायांचा पुन्हा अपमान, दिल्लीसाठी भाजपचा ‘पॉलिटिकल‘ किडा’

1039

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा अवमान केल्याचा संतापजनक प्र्रकार घडला आहे. ‘पॉलिटिकल किडा’ या हॅण्डलवरून यू टय़ूबवर आज ‘तान्हाजी’ चित्रपटातील एक गीतप्रसंग अपलोड झाला आणि अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या ‘मॉर्फिंग’ केलेल्या दृश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी, गृहमंत्री अमित शहा यांना तान्हाजी तर अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोडच्या भूमिकेत दाखवले आहे. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा पॉलिटिकल किडा वळवळल्याचा आरोप होत असून भाजपने मात्र याच्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर यू टय़ूबने हा वादग्रस्त व्हिडीओ हटवला आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमके काय
नरेंद्र मोदी क अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखवण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनीती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे असे संवादही यात घालण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या शेवटी ‘दिल्ली इलेक्शन 20‘20’ असे वाक्य आहे.

हे सहन करण्यापलीकडचे – छत्रपती संभाजीराजे
पुस्तक झालं, आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, निषेधार्ह आणि सहन करण्यापलीकडचं आहे. भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट कराकी. तसेच केंद्र सरकारनं चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

त्या व्हिडीओशी भाजपचा संबंध नाही – चंद्रकांत पाटील
पॉलिटिकल किडा नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाही. भाजप त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

त्या व्हायरल व्हिडीओची चौकशी – अनिल देशमुख
‘तान्हाजी’ चित्रपटातील दृश्याची छेडछाड करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शिवरायांचा अपमान सहन करणार नाही – संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. आमचे ते दैवत आहेत. आमचा जीव गेला तरी चालेल, मात्र छत्रपतींचा अपमान आम्हाला चालणार नाही. शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा आहे. असा अपमान सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. जर कुणी शिवरायांचा अपमान करत असेल आणि विनाकरण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर आज ते का शांत बसले आहेत? सांगली, सातारा बंद करणारे आज गप्प का बसले आहेत, असा सवालही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या