हिंमत असेल तर समोरासमोर या; अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान

राज्यात महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेसह अनेक चांगल्या योजना राबवत असताना विरोधक कोर्टबाजी करत आहेत. या योजनांमध्ये काय वाईट आहे? असा माझा त्यांना सवाल आहे. या योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मालवण घटनेवरून राजकारण करणाऱ्या आणि जोडे मारा आंदोलन करणाऱ्या विरोधकांना त्यांनी फटकारले. तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या, बघतो, या भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

कोणाचेही सरकार असले तरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळावा असे कोणाला वाटेल? असा सवाल करून अजित पवार म्हणाले, या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीने मूक आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मी राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागितली आहे. दोषींवर कारवाई व्हावी, यावरून राजकारण करू नका, असे मी सांगतो आहे.

आता सगळे पवार दारोदार फिरताहेत

लोकसभेला जे झालं ते झालं, त्या खोलात मी जात नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण काही लोक सांगतात, दादा आता बारामतीत वेगळंच वाटतं. आता सगळे पवार घरी येत आहेत. गेल्या 25-30 वर्षांत हे कोणाच्या घरी गेले नाही. ते आता दारोदार फिरायला लागले आहेत. त्यात इकडचे आणि तिकडचेपण पवार आहेत, असे सांगत अजित पवार यांनी सभेत हशा पिकवला.