प्रदूषण करणाऱ्या 21 कंपन्या बंद, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 607 उद्योगांपैकी 311 कंपन्यांचा सर्व्हे केला असून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या 50 औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून 21 कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडून प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायुप्रदूषणासंदर्भात आमदार गणपत गायकवाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते. कोणत्याही औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बाहेर सोडणे सक्तीचे आहे. प्रक्रिया न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येईल. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस जे अनधिकृतरीत्या डंपिंग करतात त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसीच्या वतीने या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भिवंडी तालुक्यातील मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, या परिसरातील दोन कंपन्या बंद केल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यांत कामगार काम करतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते, मात्र नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभू, रईस शेख आदींनी सहभाग घेतला.

…तर अधिकाऱ्यांवर कारवाई
मौजे शेलार भागात सात हजार बेकायदेशीर इमारती होत्या. अनधिकृत इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

मिठी नदी लवकरच शुद्ध ,पर्यावरणमंत्र्यांची माहिती

मिठी नदीत कचरा मिसळला जातो. त्यावर गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू आहे. मिठी नदी प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिका मिठी नदी शुद्धीकरणावर काम करत असून लवकरच आपल्याला ही नदी शुद्ध दिसेल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.
पाताळगंगा नदी प्रदूषणात वाढ होत असल्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते. ‘नीती’ आयोगाकडे दोन वर्षांपूर्वी राज्यातील 21 नद्यांबाबत प्रस्ताव पाठवला आहे. उर्वरित 18 नद्यांमध्ये एसटीपी बसविण्यात येईल, प्रकल्प लावण्यासंदर्भात पाण्याची तपासणी करून अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

पाताळगंगेवर जलशुद्धीकरण यंत्रणा
खोपोली नगर परिषद हद्दीतील सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते. कर्जतमधील जलसंधारण उपविभागाच्या अहवालानुसार खालापुर तालुक्यातील पाताळगंगा नदीवर नदी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. खोपोली नगर परिषदेकडून भुयारी गटार योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या