दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर फरार झाल्याचे समजते. दिल्ली पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असल्याने खेडकर दुसऱ्या राज्यात पिंवा विदेशात पळून गेली असावी, असे वृत्त समोर येत आहे.
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर कारवाई करताना यूपीएससीने दोन दिवसांपूर्वी तिची उमेदवारी रद्द केली होती. वडील दिलीप खेडकर यांची कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असतानाही पूजा खेडकरने क्रिमीलेयर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोटय़ातून बारा वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. तसेच बोगस कागदपत्रे सादर करून दिव्यांग कागदपत्रे मिळवली. पूजा खेडकरविरुद्ध यूपीएससी आणि लाल बहादूर शास्त्री अकादमीने तपास करून दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टाने खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र ती फरार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शेतकऱ्याला पिस्तुलचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी बरखास्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
बुधवारी कोर्टात हजर होती
पूजा खेडकर बुधवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर होती. तिने स्वतःचा युक्तिवाद केला होता. मात्र गुरुवारी जामीन नाकारल्यापासून दिल्ली पोलीस तिचा शोध घेत आहेत. मात्र खेडकर इतर राज्यात लपली असावी किंवा दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे.
आणखी सहा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार
पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या प्रकरणानंतर आता कार्मिक व प्रशिक्षण विभागाने आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहून अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून सेवेत रुजू झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा तपासणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थी आणि सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.