
मिक्सरचालकाचे अपहरण केल्याप्रकरणी तपास करण्यासाठी घरी आलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा कारनामा वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने केला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे आणि पुणे शहरातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारनाम्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
ऐरोली येथील मॅकडॉल सिग्नलजवळ गेल्या दोन दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या लँड क्रुझर गाडीला ट्रान्झिट मिक्सरचा धक्का लागला होता. नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी खेडकर यांनी मिक्सरचालक प्रल्हाद कुमार याचे अपहरण करून त्याला पुणे येथील आपल्या घरी डांबून ठेवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रबाळे पोलीस तपास करण्यासाठी पुणे येथील पूजा खेडकर यांच्या घरी गेले. पोलीस आल्याची चाहुल लागल्यानंतर खेडकर कुटुंबाने प्रल्हाद याला सोडून दिले. पोलीस तपास करण्यासाठी खेडकर यांच्या बंगल्यात गेले. त्यांनी आपले ओळखपत्रही खेडकर कुटुंबाला दाखवले. मात्र त्यांचे काहीएक ऐकून न घेता पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तर रबाळे पोलीस ठाण्यात मिक्सरचालकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.