राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर डागडुजी करुन बोळवण

सामना प्रतिनिधी । परभणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ हा परभणी शहरातून गेला आहे. या महामार्गावर रस्त्याची ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी अवस्था असताना रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार केल्यानंतर या रस्त्याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खानापूर फाटा या रस्त्यावर डागडुजीचे काम हाती घेतले आहे. हे डागडुजीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून ही डागडुजी म्हणजे केवळ बोळवण असल्याची प्रतिक्रीया जनसामान्यातून व्यक्त होत आहे. एकिकडे चौपदरी मार्गाच्या चर्चा होत असताना हे आश्वासन हवेत विरले आहे की काय? अशी खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे.

परभणी शहरातील अत्यंत मध्यवस्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते खानापूर फाटा हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. विशेष म्हणजे या रस्त्यारुन दररोज जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी मंडळी दररोज ये-जा करत असते. या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे.

महानगरपालिका हा रस्ता आपल्या हद्दीत येत नाही, असे कारण सांगून या रस्त्याकडे दुर्लक्ष करते. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता दुरुस्तीचा विषय असल्याने या रस्त्याकडे लक्ष द्यायला याच विभागाला वेळच नाही की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठांचे आदेश रस्ता दुरुस्ती संदर्भात येत नसल्याच्या कारणाने सा.बां. विभाग निद्रीस्त अवस्थेत असल्याचे स्पष्टचित्र दिसून येत आहे. जागोजागी खड्डेच खड्डे आणि या खड्ड्यांमुळे होणारे छोटेमोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. वसमत रोडवर या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था वारवांर कोलमडली जात आहे. त्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ता अक्षरश: खरडून गेला आहे. या रस्त्यावर सध्या डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही डागडुजी रात्रीच्यावेळी देखील करता आली असती, पण सध्या भर दिवसा या रस्त्यावर गिट्टी आणि अल्पशे डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे. हे काम चालू असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीवर अडथळा मोठ्या प्रमाणावर होत आहे. राष्ट्रीय मार्ग हा चौपदरी होणार असे आश्वासन गेल्या १० वर्षापासून ऐकविण्यात आहे. परंतु या रस्त्यावर साधे डांबरीकरण सुद्धा होत नसल्याने जागोजागी खड्डेच खड्डे असल्याने शिवसेनेने या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महायज्ञ आणि खड्ड्यांच्या ठिकाणी बेशरमाची झाडे लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. सध्या मात्र या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे डागडुजी करुन केवळ बोळवण केली जात असल्याची संतप्त प्रतिक्रीया जनसामान्यातून उमटत आहे.