
>> प्रभाकर पवार
मुंबईचे एकेकाळचे धडाडीचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या ‘व्हेन इट ऑल बिगन: अनटोल्ड स्टोरीज ऑफ द अंडरवर्ल्ड’ या मुंबईतील रक्त गोठविणाऱ्या गुन्हेगारीवर आधारित पुस्तकाचे (इंग्रजी) प्रकाशन गेल्या आठवड्यात जुहू येथील सोहो हाऊसमध्ये माजी पोलीस आयुक्त रॉनी मेन्डोन्सा, एम. एन. सिंग, डॉ. पी. एस. पसरिचा, सतीश सहानी, पोलीस महासंचालक प्रशांत बुन्हाडे, कमलाकर, सहपोलीस आयुक्त जयकुमार, अभिनेते नाना पाटेकर, अजय देवगण, निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी, महेश भट्ट, बोनी कपूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
अफगाणिस्तानातील पेशावरमधून करीम लाला हा पठाण आपल्या वयाच्या 21 व्या वर्षी (1930 साली) नोकरीसाठी मुंबईत आला. तेव्हापासून मुंबईत सुरू झालेल्या टोळी युद्धावर राकेश मारिया यांनी सखोल अभ्यास करून आपल्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. मुंबईतील शूटआऊटमध्ये पहिला बळी कुण कुणाचा गेला? मुंबई पोलिसांच्या चकमकीत कुठला पहिला गुंड मारला गेला. अगदी मन्या सुर्वेपासूनच्या एन्काऊंटरची माहिती राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. गुन्हेगारीचे, भाईगिरीचे दक्षिण मुंबईतील ‘डोंगरी’ हे केंद्रस्थान होते. तेथूनच प्रतिस्पर्धी टोळीचे डेथ वॉरंट जारी व्हायचे. मुंबईतील बडे स्मगलर हाजी मस्तान, युसूफ पटेल, दाऊद यांच्या तस्करीचाही राकेश मारिया यांनी पर्दाफाश केला आहे. आपल्या पुस्तकात त्यांनी भारतीय महसूल विभागाचे कस्टम अधिकारी दया शंकर यांचा ‘स्मगलरांच्या विरोधातील एक डेअर डेविल अधिकारी असा उल्लेख केला आहे. दया शंकर हे अत्यंत प्रामाणिक व धाडसी अधिकारी होते. दाऊद टोळीवर कारवाई करताना दया शंकर यांनी दाऊदच्या भावालाही न डगमगता अटक केली होती. त्याचा किस्सा सांगताना राकेश मारिया आपल्या पुस्तकात म्हणतात, दया शंकर प्रामाणिक होते. त्यांनी कोणत्याही गुन्हेगारांशी कधी सौदा केला नाही. दाऊदचा भाऊ अनिस यास दया शंकर यांनी गाडीचा पाठलाग करून तस्करी प्रकरणात पकडले, परंतु त्याचा भाऊ नुराचे त्याच दिवशी लग्न असल्याने फक्त एका रात्रीसाठी कासकर कुटुंबीयांच्या विनंतीवरून अनिसला दया शंकर यांनी घरी सोडले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ताब्यात घेऊन त्याची जेलमध्ये रवानगी केली. दया शंकर यांना दाऊदही देव मानायचा. अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची आपल्या देशाला खरी गरज आहे असेही तो म्हणायचा. असे राकेश मारिया यांनी ज्येष्ठ पत्रकार बलजित परमार यांनी इल्युस्ट्रेटेड विकली’ या इंग्रजी दैनिकात दया शंकर यांच्या धाडसी कारवाईबद्दल छापून आलेल्या बातमीचा हवाला देत दया शंकर यांचे कौतुक केले आहे. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात कस्टम कमिशनर दया शंकरसारख्या लिजंडरी ठरलेल्या अधिकाऱ्याचा देशहितकारक असा उल्लेख केला आहे. परंतु राकेश मारिया हेही एक दंतकथाच आहेत.
मुंबईतील जातीय दंगल शमल्यानंतर माहीमच्या टायगर मेमन या स्मगलरने हिंदूंना धडा शिकविण्यासाठी आयएसआय व दाऊदच्या मदतीने मुंबईत 13 बॉम्बस्फोट घडवून आणले. या भयंकर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त राकेश मारिया यांची मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी अमरजीत सामरा हे पोलीस आयुक्त, तर एम. एन. सिंग हे मुंबई क्राईम बॅचची प्रमुख (सहपोलीस आयुक्त) होते. या अधिकाऱ्यांनीच राकेश मारिया यांना मुंबई क्राईम ब्रँचमध्ये आणले. मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचची डीसीपी म्हणून १ जानेवारी 1994 रोजी राकेश मारिया यांनी सूत्रे हाती घेतली. डिटेक्शन क्राईम ब्रँचचे मारिया हे पहिले डीसीपी होते. त्याआधी एसीपीच मुंबई क्राईम ब्रँचची सर्व युनिट सांभाळायचे. मारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी एम. एन. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली 189 बॉम्बस्फोट आरोपींना अटक केली. त्या वेळी राकेश मारिया चर्चेत आले. त्यांच्या नावाचा अंडरवर्ल्डमध्ये दबदबा निर्माण झाला, परंतु गँगवॉर मात्र वाढले. पोलीस बॉम्बस्फोट तपासात गुंतले आहेत हे पाहून सर्व संघटित टोळ्या सक्रिय झाल्या. आमदार, नगरसेवक, सिने निर्माते, दिग्दर्शक, बिल्डर, हॉटेल मालक यांना थेट गोळ्या घालून ठार मारण्यात येऊ लागले. तेव्हा राकेश मारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी एन्काऊंटर या आपल्या हुकमी अस्त्राचा वापर करून गँगवॉर आटोक्यात आणले. टाडा अन्वये कारवाई करून गुंडांना जेरबंद केले. राकेश मारिया यांचे मुंबई क्राईम ब्रँचसाठी व जनता जनार्दनासाठी मोठे योगदान ठरले आहे. मारिया यांच्या इतका प्रभावी, प्रेरणादायी, नेतृत्व गुण संपन्न तसेच भरपूर कुशलता असलेला अधिकारी गेल्या तीन दशकांत आमच्या तरी पाहण्यात आलेला नाही. राकेश मारिया 2017साली राज्य पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले, परंतु आजही त्यांच्या कामाची, कार्यशैलीची मुंबई क्राईम बॅचमध्ये, मुंबई पोलीस दलात चर्चा असते. क्राईम ब्रँचमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणारे अनेक अधिकारी आहेत, परंतु राकेश मारियांसारखे असामान्य अधिकारी मात्र फार कमी आहेत.
























































