
>> प्रभाकर पवार
हुंड्यासाठी वैष्णवी या 23 वर्षीय तरुणीचा बळी घेणाऱ्या पुणे जिल्ह्यातील (ता. मुळशी) भुकूमच्या हगवणे या अत्यंत विकृत कुटुंबाला बावधन पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली. त्यात वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे (27), सासू लता राजेंद्र हगवणे (50), नणंद करिश्मा हगवणे (24), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (57) या आरोपींची नावे आहेत, तर वैष्णवीच्या अत्याचारात सहभागी असलेला हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण हा बदकर्मी फरार आहे.
16 मे 2025 रोजी वैष्णवीने आपल्या सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्या वेळी तिच्या दोन्ही मांड्यांवर, पायांवर, पाठीवर व डोक्यावर अशा 30 जखमा आढळून आल्या होत्या. वैष्णवीचे वडील (राहणार कस्पटे वस्ती, वाकड, पुणे) आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (51) यांना बावधन पोलिसांनी बोलावून त्यांची फिर्याद घेतली तेव्हा त्यांना हुंदके व अश्रू आवरेनात. मुलीच्या सुखासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी लग्नात करोडो रुपये खर्च केले होते, परंतु कस्पटे कुटुंबीयांच्या पदरी निराशा आली.
कस्पटे आपल्या फिर्यादीमध्ये म्हणतात. 18 व 21 वर्षांचे दोन मुलगे, एक मुलगी व पत्नी असा माझा परिवार आहे. मुलगी वैष्णवीचे शशांक हगवणे या सधन कुटुंबातील तरुणाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे मला कळल्यावर मी 28 एप्रिल 2023 रोजी मुलीचे शशांकबरोबर लग्न लावून दिले. लग्नामध्ये मुलाकडून फॉर्च्यूनर गाडी, 51 तोळे सोने, चांदीची भांडी तसेच लग्नाचा सर्व खर्च अशी मागणी करण्यात आली होती, ती मी पूर्ण केली, परंतु लग्न झाल्यानंतरही मुलगा शशांककडून व त्याच्या आईकडून वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करण्यात येत होती. एकदा तर मुलगा शशांकने दोन कोटी रुपये जमीन खरेदीसाठी माझ्याकडे मागितले. परंतु मी त्यास नकार दिला. तेव्हापासून चिडलेल्या हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला वारंवार माहेरी पाठवू लागले व पैशांची मागणी करू लागले. ती पूर्ण होत नाही असे लक्षात आल्यावर वैष्णवीला झालेला मुलगा आपला नाहीच असा पवित्रा पती शशांकने घेतला. त्यामुळे माझ्या चारित्र्यवान मुलीला जीव गमवावा लागला. तिचा खून करण्यात आला आहे. स्वतः पती शशांकने वैष्णवीला मारून टाकल्याची कबुली मला दिली आहे, असाही कस्पटे यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे.
कस्पटे यांनी तक्रारीत आपल्या मुलीची हत्या करण्यात आली असा आरोप केला, परंतु पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या बावधन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केले, हुंड्याची मागणी केली आदी कलमांची नोंद एफआयआरमध्ये केली आहे.
हगवणे यांची मोठी सून मयुरी हिचेही हगवणे कुटुंबीयांनी अनन्वित हाल केले आहेत. तीही दीड वर्षापूर्वी सासरच्या घरातून बाहेर पडली तिने अनेकदा पोलिसांत व महिला आयोगाकडे हगवणे कुटुंबीयांविरुद्ध तक्रारी केल्या, परंतु शशांक हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा असल्याने ना पोलिसांनी कारवाई केली, ना राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली. मयुरीच्या तक्रारीची दखल घेऊन जर कारवाई झाली असती, तर वैष्णवीचे नक्कीच प्राण वाचले असते, असे मयुरी बोलत आहे.
थोडक्यात सत्ताधारी कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा या राज्यात ‘आतंक’ सुरू आहे व आपले पोलीसही त्यांच्यापुढे नांग्या टाकत आहेत. आज प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वाल्मीक कराड, शशांक हगवणेसारखे खलनायक आहेत. राजकीय पक्षांना आपली पार्टी वाढविण्यासाठी हगवणेसारखे क्रूरकर्मा हवे असतात. साम, दाम, दंड, भेदाने असेच दुराचारी लोक पक्ष मोठा करतात. मग पोलीस ठाण्यात वैष्णवी, मयुरीसारख्या विवाहित तरुणींना कसा न्याय मिळेल? ज्यांचे राजकीय लागेबांधे आहेत, ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे अशांचेच पोलीस ठाण्यात ऐकले जाते. “आपल्या विरुद्ध जाणाऱ्यांचे हातपाय तोडा आणि माझ्याकडे या.” असे आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर कार्यक्रमात बोलणारे, पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार जर सत्तेत असतील तर सामान्यांना कधीच न्याय मिळणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या एका मंत्र्याचा दिवटा गेली अनेक वर्षे आपला मानसिक व शारीरिक छळ करीत आहे. अशी तक्रार अलीकडे एका महिलेने पोलिसांत केली होती.
वैष्णवीच्या आत्महत्येचे प्रकरण ‘मीडिया ने उचलून धरल्यामुळे चर्चेत आले. परंतु आज घराघरात ‘वैष्णवी’ आहेत. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. माहेरून पैसे आणण्यासाठी सासरकडून त्यांचा छळ करण्यात येत आहे. भारतात 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. तरीही आपल्या प्रगतिशील देशात महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी छळवणूक थांबलेली नाही. उलट घरगुती हिंसाचार वाढला आहे. देशात मिनिटागणिक महिलांवर अत्याचार होत आहेत हुंड्यासाठी त्यांचे बळी घेतले जात आहेत. मीडियाने जर उचलून धरले नसते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गब्बर हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा खून नक्की पचवला असता.
आज हगवणेसारखे पशू प्रत्येक पक्षात आहेत. गुन्हे दाखल झालेल्या… तडीपार करण्यात आलेल्या राजकीय पुढाऱ्यांनाच आपल्या देशात… राज्यात गृहमंत्री, राज्यमंत्री केले जाते. रूपाली चाकणकरसारख्या राजकीय पक्षाच्या महिलेला महिला आयोगाचे अध्यक्ष केले जाते. मग गुंडापुंडाच्या या राज्यात आमच्या भगिनींना कसा न्याय मिळेल, असा प्रश्न पडतो.