
>> प्रभाकर पवार, [email protected]
देशभरातील 100 च्यावर स्त्री-पुरुषांना डिजिटल अटकेची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ९ सायबर माफियांना बंगालच्या कल्याणी न्यायालयाचे सत्र न्यायाधीश सुबर्थी सरकार यांनी नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
महाराष्ट्र, हरयाणा व गुजरातमधील हे ९ आरोपी असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. सायबर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची या देशातील ही पहिलीच वेळ आहे. हा खटला सहा महिने चालला. त्यात चार राज्यांतील 29 साक्षीदार तपासले गेले. त्या साक्षीदारांमध्ये मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
या निकालाविरुद्ध आरोपी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, परंतु बंगाल सीआयडी पोलीस अधिकारी अखिलेश चतुर्वेदी म्हणाले, “आरोपींनी देशभरातील वेगवेगळ्या बँक खात्यांत तक्रारदारांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले होते. त्याबाबतचे सर्व तांत्रिक पुरावे आमच्याकडे आहेत. मोबाईल, सिमकार्ड, बँक पासबुक, एटीएम कार्ड आदी यंत्रसामग्री आम्ही जप्त केलेली आहे. हे पुरावे जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी पुरेसे आहेत,” असेही पोलीस महानिरीक्षक चतुर्वेदी यांनी सांगितले. खंडणीसाठी डिजिटल अटकेची भीती दाखविणाऱ्या व आर्थिक दहशतवाद निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, अशीही न्यायालयाने टिपणी केली आहे. कोलकात्याच्या सत्र न्यायालयाने नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली याचा सायबर माफियांवर अद्याप परिणाम झालेला दिसत नाही. रोज ऑनलाइन फसवण्याचे गुन्हे घडतच आहेत. मुंबईत किमान दोन तरी व्यक्तींना सायबर माफिया फसवतात व ही फसवणूक कोटींमध्ये असते.
डिजिटल अरेस्ट म्हणजे आभासी अटक. आपण सीबीआय, पोलीस, ईडी, इन्कम टॅक्स, कस्टम आदी प्राधिकरणांचे अधिकारी असल्याचे भासवून जे अज्ञात माफिया फोन करतात, ते तक्रारदाराला म्हणतात “आपण फ्रॉड केला आहे, आपला अमली पदार्थांच्या तस्करीत, मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग आहे.” अशी वेगवेगळी कारणे सांगून आपणास डिजिटल अटक करण्यात आल्याचेही भासवतात. गुन्ह्यात आपल्या मोबाईलचा, आधारकार्डचा, बँक खात्याचा वापर झाला आहे असे सांगून घाबरवून सोडतात. आपली जामिनावर सुटका व्हावी असे वाटत असेल तर आम्ही नमूद केलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करा, असेही बजावतात. डिजिटल अटकेला घाबरलेले बरेच लोक आपले घरदार, दागदागिने विकतात, कर्ज काढतात किंवा बँकेत जमा असलेली रक्कम सायबर माफियांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. सायबर माफियांची ही कार्यपद्धती देशभरात सुरू असताना आता ज्या ठिकाणी समभाग किंवा शेअर्सची खरेदी विक्री केली जाते, त्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची फसवणूक करण्याचे नवे सत्र सुरू झाले आहे. गुंतवणुकीशी संबंधित फसव्या जाहिराती ऑनलाइन दिल्या जातात. गुंतवणूकदारांना एसएमएस करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. फोन करून आपण बड्या वित्त संस्थेमध्ये उच्च पदावर असल्याचेही सांगितले जाते व आपल्या फ्रॉड व्हॉटस्अॅपच्या ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते.
दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथील बहुचर्चित ‘प्रभुकुंज’ या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका 57 वर्षीय व्यावसायिकाने इन्स्टाग्रामवर शेअर्स गुंतवणूकविषयक जाहिरात पाहत असताना एका आकर्षक जाहिरातीवर क्लिक केली. तेव्हा त्यांना पटकन सरोज गुप्ता नामक तरुणीचा मेसेज आला. या व्यावसायिकाला आपल्या कंपनीच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये सामील (Add) करून घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. आमच्या कंपनीकडून कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे याची ‘टीप’ दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला भरघोस नफा मिळेल असेही त्या महिलेने त्या व्यावसायिकाला सांगितले. सरोज गुप्ता नावाची ही महिला व तिचे साथीदार या व्यावसायिकाला रोज कोणते शेअर्स खरेदी करायचे याची टीप द्यायचे.
त्याप्रमाणे ते व्यावसायिक शेअर्स खरेदी करायचे. लाखाचे दोन लाख झाले. दोन लाखांचे वीस लाख झाले, अशी शेअर्सची रक्कम वाढल्यानंतर या व्यावसायिकाचा मोह वाढला. तेव्हा त्याने दोन महिन्यांत पाच कोटी रुपये गुंतवले. त्याचे जेव्हा 50 कोटी झाले तेव्हा त्या व्यावसायिकाने बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या बँक खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर (withdraw) झाला नाही. व्हॉटस् अॅप ग्रुप खोटा होता. कंपन्या बोगस होत्या. त्याला टीप देणारे बनावट होते असे लक्षात आल्यावर त्या व्यावसायिकाने दक्षिण मुंबईतील सायबर सेलकडे धाव घेतली. तोपर्यंत त्या व्यावसायिकाचा सारा पैसा परदेशात ट्रान्सफर झालेला होता.
पश्चिम मुंबईतील एका 62 वर्षीय महिलेनेही अलीकडे शेअर्स बाजाराच्या बोगस व्हॉटस अॅप ग्रुपमध्ये सामील होऊन सात कोटी रुपये गमावले. गेल्याच आठवड्यात 56 वर्षीय एका पायलटला तीन कोटी रुपयांस शेअर्स मार्केटच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने फसविले. डॉक्टर, वकील, बड्या बड्या कंपन्यांचे डायरेक्टर शेअर बाजारातील भरघोस परताव्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. शेअर बाजार हा जुगार आहे हे शेंबडे पोरही सांगेल. तरीही शिक्षित, उच्चशिक्षित लोक मोहाला बळी पडून आयुष्यातून उठत आहेत. काही लोक आत्महत्या करीत आहेत.
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करून लोकांना फसवत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या, जवळच्या नातेवाईकांच्या, कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमांचा, चेहऱ्यांचा व्हॉटस् अॅपवर डीपी ठेवून लोकांची ऑनलाइन फसवणूक करीत आहेत. अलीकडे महाराष्ट्र पोलीस दलात स्वच्छ प्रतिमा असलेल्या विश्वास नांगरे पाटील या आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा, त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून लोकांना वारंवार फसविले जात आहे. तेव्हा डिजिटल इंडियाचा डंका पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सायबर गुन्हेगारीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. दरवर्षी सायबर क्राइम शेकडो पटीने वाढत आहे. गेल्या वर्षी (2024) 23 हजार कोटी रुपयांची परदेशी सायबर माफियांनी आपल्या देशवासीयांची (37 लाख लोकांची) फसवणूक केली आहे. त्यात लोकांच्या जरी चुका असल्या तरी केंद्र शासन देशात, परदेशात बसलेल्या सायबर माफियांचा कायमचा का बंदोबस्त करू शकत नाही? असा सवाल करण्यात येत आहे. दरवर्षी 25-30 हजार कोटी रुपये परदेशी माफिया लुटतात याचे राज्यकर्त्यांना काहीच वाटत नाही का?