‘कोल्हापुरी’ दणका मिळताच ‘प्राडा’ नरमले, चपलांचे डिझाईन ढापल्याची दिली कबुली

काही दिवसांपूर्वी इटली येथे झालेल्या ‘प्राडा’ कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपला या इटालियन लेदर फूटवेअर डिझाईन म्हणून विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्राडा कंपनीने स्वतःचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विकण्याचा घाट घातला. याबद्दल प्राडा ब्रॅण्डवर चोहोबाजूने जोरदार टीका झाली. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा चोरल्याचा आरोप झाला. अखेर प्राडाने नमते घेतले आणि आपली चूक मान्य केली. प्राडाने 27 जून रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र लिहिले आणि सांगितले की त्यांचे डिझाईन कोल्हापुरी चपलांपासून प्रेरित होते.

कोल्हापुरी चपलाचा वाद झाल्यानंतर प्राडा कंपनी आता त्यांच्या महागड्या ब्रॅण्डसाठी चर्चेत आलेय. कंपनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाखो रुपयांच्या वस्तू विकल्या जातात. प्राडाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शोल्डर बॅग 2250 डॉलरला, म्हणजे साधारण 1 लाख 93 हजार रुपयांना विकली जाते. तर सँडलची किंमत 1 लाख 21 हजार रुपये आहे. प्राडाचे सनग्लासेस 20 ते 15 हजारांना उपलब्ध आहेत. तर त्यांचे अँटिक लेदर बेल्ट 1150 डॉलर म्हणजे 99 हजार रुपयांना विकले जाताहेत. अखेर प्राडाने आपली चूक मान्य केली. लेदर सँडल या कोल्हापुरी चपलांपासून प्रेरित असल्याची कबुली दिली.