सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्या, प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने द्यावी. तसेच सूर्यवंशी कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज केली.

आंबेडकर यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. आंबेडकर यांनी एक्सवर यासंबंधीची एक पोस्ट करत माहिती दिली आहे. परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे अशा पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

घरांची मोडतोड झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई

आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटीसंदर्भातसुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याचे आंबेडकर म्हणाले.