
>> प्रसाद ताम्हनकर
जगभरातील अनेक प्रमुख देशांच्या अंतराळ संशोधन संस्था या विविध शोधकार्यांमध्ये आणि वेगवेगळ्या मोहिमा आखण्यामध्ये गुंतलेल्या असतात. कधी या मोहिमा, शोधकार्य हे एकेकटय़ाने केले जाते किंवा मग इतर देशांच्या सहकार्याने ती योजना पार पाडली जाते. या मोहिमांमध्ये विविधता असली तरी प्रत्येक अंतराळ संशोधन संस्थेचे एक स्वप्न आहे आणि ते म्हणजे चंद्रावर मानवी वस्ती वसवणे. पुरातन कालापासून मानवाला आकाशाची ओढ आहे आणि त्यातल्या त्यात चंद्र हा या सर्वांच्या केंद्रभागी आहे. अशा लाडक्या चंद्रावर मानवाने वस्ती करण्याची स्वप्ने अनेक वर्षे बघितलेली आहेत आणि त्यादृष्टीने आता छोटी छोटी पावले पडायला सुरुवातदेखील झालेली आहे.
चंद्रावर मानवी वस्तीसाठी सर्वात आवश्यक असेल ती म्हणजे ऊर्जा. चंद्रावर काही प्रमाणात ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची तयारी नासा या जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने केलेली आहे. मात्र सध्या ट्रम्प प्रशासनाने नासाला देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीत मोठी कपात केल्याने हे स्वप्न कसे साकार होणार, याबद्दल काही संशोधकांना चिंता लागलेली आहे, तर दुसरीकडे रशिया आणि चीन या तेवढय़ाच तुल्यबळ देशांनी एकत्र येत याच योजनेवर स्वतचे काम सुरू केले आहे. ही स्पर्धा विज्ञानाच्या पलीकडे जाऊन राजकीय रंगात रंगू नये अशी प्रार्थना जगभरातील संशोधक करत आहेत.
सध्या अमेरिका, हिंदुस्थान, जपान, रशिया, चीन अशा देशांमध्ये चांद्रमोहिमांची आणि चंद्राच्या अभ्यासाची स्पर्धा सुरू आहे. काही यशस्वी मोहिमादेखील या देशांनी पार पाडलेल्या आहेत. मात्र चंद्रावर अणुभट्टी उभारणे हे अत्यंत जिकरीचे आणि प्रचंड खर्चाचे कार्य असणार आहे. अमेरिकन कंपनी नासाने काही काळापूर्वी म्हणजे 2022 मध्ये तीन प्रमुख कंपन्यांना अशा अणुभट्टीचे डिझाइन तयार करण्यासाठी प्रत्येकी 5 लक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले होते. सध्या नासाने 100 किलोवॅट वीज निर्माण करू शकणाऱया अणुभट्टीच्या रचनेसाठी खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवल्याची चर्चा आहे.
चंद्रावर अणुभट्टी उभारणे हा काही पर्यायांपैकी एक पर्याय नसून ती काळाची गरज असल्याचे मत काही संशोधकांनी मांडले आहे. अणू ऊर्जा हा आता पर्याय नसून अपरिहार्यता बनलेली आहे. चंद्रावर संशोधनासाठी वस्ती करण्यासाठी अंतराळवीरांच्या एक छोटय़ा गटाला अनेक मेगावॅट ऊर्जेची गरज भासेल आणि ही गरज फक्त बॅटरी आणि सोलर पॅनेलने भागणे शक्य नाही. मुख्य म्हणजे चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या चार आठवडय़ांच्या बरोबरीचा असतो. ज्यामध्ये साधारण दोन आठवडे सूर्यप्रकाश आणि दोन आठवडे पूर्ण अंधार असतो. त्यामुळे पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून राहणेदेखील शक्य होणार नाही.
अणुभट्टीच्या हा सर्व चर्चांमध्ये काही संशोधक एक वेगळी भीती व्यक्त करत आहेत. पृथ्वीवरून किरणोत्सर्गी पदार्थ सुरक्षितपणे अंतराळात नेण्याचे काम अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांचे मत आहे. त्यासाठी एका विशेष परवानगीची आवश्यकता लागेल असे त्यांचे मत आहे. काही संशोधक एका वेगळ्याच धास्तीत आहेत. त्यांनी त्यासाठी ‘आर्टेमिस करारा’चा दाखला दिला आहे. जगातील सात प्रमुख देशांनी 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी केली असून चंद्रावरील संशोधनात एकमेकांना कसे साहाय्य करावे याचे काही नियम बनवले आहेत. एखाद्या देशाने आपली उपकरणे चंद्रावर बसवल्यास अशा उपकरणांभोवती सुरक्षा क्षेत्र तयार करण्याचे आवाहन त्यात केलेले आहे. अणुभट्टी मोहिमेत जर रशिया आणि चीनने बाजी मारली तर या नियमाचा फायदा घेत ते आपल्या अणुभट्टीभोवतालचे क्षेत्र सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करतील आणि एक प्रकारे जगातील इतर सर्व देशांना चंद्र प्रवेशास बंदी येईल अशी भीती त्यांना वाटते आहे.
काही सुजाण संशोधकांच्या मते, जग पुन्हा एकदा जुन्या काळातील अंतराळ शर्यतीचा अनुभव घेत आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे चित्र फार निराशादायक आहे. विज्ञान आणि संशोधन हे नेहमी राजकारणापासून सुरक्षित अंतरावर असणे गरजेचे आहे आणि त्याचा वापर फक्त लोककल्याणासाठी होणे आवश्यक आहे.