रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाचे नाव जन सुराज पक्ष असे ठेवले आहे. 2025 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली आहे.
पक्ष सुरू करताना प्रशांत किशोर म्हणाले की गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमाही जन सुराज अभियान चालवत आहोत. आम्ही पक्ष कधी सुरू करणार याबाबत लोक आम्हाला विचारत होते. आज निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे असे किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी आपला पक्ष सुरू केल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून मनोज भारती यांची नियुक्ती केली आहे. मनोज भारती हे हिंदुस्थानचे चार देशात राजदूत म्हणून राहिले आहेत.
रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी भाजप आणि काँग्रेससाठी काम केले होते. आता बिहारमधून राजकीय पक्ष स्थापन करून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपण राजकीय पक्ष स्थापन करणार अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी आधीच केली होती. आता 2025 साली बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत प्रशांत किशोर सर्व जागा लढवणार आहेत.