प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील चार धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, विक्री घटकातील इमारत रद्द करून संक्रमण शिबिराची उभारणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास चार धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

या ठिकाणी प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱया काही इमारतींचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी संक्रमण सदनिकांची इमारत बांधण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

प्रतीक्षानगर येथील संक्रमण इमारत क्र. 36, 37, 53 व 54 खालून भूमिगत जलवाहिनी गेली असल्यामुळे या इमारतींना तडे जाण्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने मुंबई मंडळाने आयआयटी मुंबई यांच्यामार्फत संबंधित इमारतींचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील अहवालामध्ये या चारही संक्रमण इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत नमूद करण्यात आले. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर व भाडेकरू, रहिवाशांची त्याच ठिकाणी स्थलांतर करण्याच्या मागणीचा विचार करून या संक्रमण इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.

322 संक्रमण सदनिका बांधणार 

चार संक्रमण इमारतींतील 261 रहिवासी व 4 दुकानदारांसाठी 22 मजली अशी एकूण 322 संक्रमण सदनिकांचा समावेश असलेल्या दोन इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींमध्ये त्यांचे स्थलांतर पात्रतेच्या धोरणानुसार केले जाणार आहे. या संक्रमण इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे लागणार आहेत.