श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 6 जुलैला अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंद येथे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा पुरवण्यासाठी प्रशासन, लोणंद नगरपंचायत, विविध संस्था संघटना व नागरिकांसह सर्वच यंत्रणांनी सुसज्जता ठेवावी, वारकऱयांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, पालखी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर करून कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले.
श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सहा जुलैला जिह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याचा लोणंदला सहा, सात व आठ जुलै रोजी अडीच दिवसांचा मुक्काम आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन व विविध संस्था, संघटना यांच्या वतीने वारकरी व भाविकांना पुरवण्यात येणाऱया सेवासुविधांच्या तयारीच्या आढावा बैठकीत तहसीलदार पाटील बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, नगराध्यक्षा सीमा खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगरसेवक गणीभाई कच्छी, सागर शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वीज वितरणचे पाटील उपस्थित होते.
अजित पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यातील वारकऱयांना वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा या प्रमुख बाबी नेहमीप्रमाणे चांगल्या रीतीने पुरवून वारकऱयांच्या सेवेचा लाभ घ्यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई व हलगर्जीपणा न करता सेवाभाव ठेवावा तसेच पालखी सोहळा विश्वस्तांच्या सूचनांनुसार तयारी करावी लागणार आहे. सर्वच विभागांच्या वतीने कामे युद्धपातळीवर करून वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले, बाजारतळावरील सार्वजनिक शौचालय पालखीकाळात सर्वांसाठी मोफत वापरासाठी खुले करण्यात येणार आहे. पाडेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर पाणीपुरवठय़ाची सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्यात येत आहे.
स्वागताची तयारी…
n खंडाळा पंचायत समितीच्या वतीने जिह्याच्या सीमेवरील स्वागत कमानीची रंगरंगोटी करून स्वागताची तयारी करण्यात येत आहे. सर्व रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडून व खड्डे बुजवून डागडुजी करून व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही यावेळी तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्या.
नीरा स्नानाच्या ठिकाणाची डागडुजी
n श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नीरा नदीच्या दत्त घाटावर होणाऱया नीरा स्नानासाठी पादुका नीरा नदीत नेताना मोठी गर्दी होते. पायऱयांवरून नदीत उतरताना घसरले जाते, त्या ठिकाणी सिमेंटचे काँक्रीट करण्यात यावे, तर नीरा नदीवरील जुन्या पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक लोखंडी जाळी लावण्याची सूचना ह.भ.प. बाळासाहेब चोपदार यांनी केली.