दिल्लीपेक्षा मुंबईतील घर महाग, नाईट फ्रँकचा अहवाल

मुंबईत दिवसेंदिवस घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, याचाच प्रत्यय रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ‘नाईट फ्रँक’ने नुकत्याच जारी केलेल्या ‘प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स’ या अहवालातून आला आहे. कंपनीने घरांच्या बाबतीत महागडय़ा जगातील टॉप 44 शहरांची यादी जारी केली असून या यादीत मुंबई तिसऱया तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

जगातील टॉप 44 शहरांत जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत घरांच्या वाढलेल्या किमतीचा अभ्यास करून ‘नाईट फ्रँक’ने हा अहवाल जारी केला आहे. वार्षिक 26.2 टक्के वाढीसह घरांच्या बाबतीत मनीला हे जगातील सर्वात महागडे शहर ठरले. त्यापाठोपाठ 12.5 टक्के वाढीसह टोकियो दुसऱया क्रमांकावर आहे. टॉप 10 शहरांमध्ये 11.5 टक्के वार्षिक वाढीसह मुंबई तिसऱया तर 10.5 टक्के वाढीसह दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या यादीत मुंबई सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर होती. दुसरीकडे बंगळुरू शहराची मात्र घसरण झाली आहे. गेल्या वर्षी या यादीत सोळाव्या क्रमांकावर असलेले बंगळुरू यंदा सतराव्या स्थानी आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत बंगळुरूमधील घरांच्या किमतीत 4.8 टक्के वाढ झाली.