मालवणातील राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रावर वज्राघात झाला. मराठी मन दुखावले आणि अवघ्या राज्यात सरकारविरोधात प्रचंड संताप उफाळला. त्यानंतर पालघरमध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज माफी मागावी लागली. सिंधुदुर्गात जे घडलं ते अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचं आराध्य दैवत आहे. मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो असे मोदींनी हात जोडून सांगितले. छत्रपती शिवरायांना आराध्य मानणाऱयांच्याही मनाला वेदना झाल्या, मी त्यांचीही माफी मागतो असे मोदी म्हणाले. मोदींच्या या माफीनाम्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर दिलगिरी व्यक्त न करणाऱया महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना सणसणीत चपराक बसली आहे.
मालवण येथील राजकोट परिसरात नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फुटी पुतळय़ाचे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. हा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर या पुतळा दुर्घटनेचे पाप नौदलावर ढकलण्याचा आटापिटा मिंधे सरकारने केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुतळा कोसळण्याचे खापर वाऱयावरही पह्डले, तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘या वाईटातून काहीतरी चांगले होईल’ अशी मल्लिनाथी केल्याने अवघ्या महाराष्ट्रात मिंधे सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर पुतळा दुर्घटनेवर आधी अजितदादा नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली.
76 हजार 200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आणि 1563 कोटी रुपयांच्या मत्स्य व्यवसाय प्रकल्प योजनेचे लोकार्पण आज पालघर येथील सिडको मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. राजकोट येथील पुतळा दुर्घटनेवर नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे साऱयांचे लक्ष लागले असतानाच भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी महाराष्ट्रात उसळलेल्या जनप्रक्षोभापुढे लोटांगण घातले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, ते केवळ राजे नाहीत तर ते आराध्य दैवत आहेत, असे मोदी म्हणाले. मी आज माझे मस्तक त्यांच्या चरणावर झुकवून त्यांची माफी मागतो, असे सांगतानाच मोदी यांनी या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांचीही माफी मागत असल्याचे सांगितले. मोदींच्या या माफीनाम्यामुळे व्यासपीठावर बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्पृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार हेमंत सवरा यांच्यासह राज्यातल्या भाजप नेत्यांना सणसणीत चपराकच बसली.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधापृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकासमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्य व्यवसायमंत्री राजीव रंजन सिंह, मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज पुरीयन, बंदर विकास राज्यमंत्री शंतनू ठापूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे केंद्र बनेल
आजचा दिवस विकसित हिंदुस्थानच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राकडे सामर्थ्य आणि संसाधने आहेत, समुद्राचे तटही आहे. त्यामुळे पुरातन काळात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा केंद्रबिंदू होता आणि त्यासाठीच आम्ही वाढवण बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मोदी म्हणाले. वाढवण बंदरामुळे बारा लाख व्यवसाय, रोजगार उपलब्ध होतील आणि मच्छीमारांसाठी 700 कोटींची योजनाही आकाराला येईल, असेही त्यांनी सांगितले.
नारीशक्ती हिंदुस्थानचा आधार
महाराष्ट्रात अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे शानदार काम करीत आहे. ही नारीशक्ती विकसित हिंदुस्थानचा आधार आहे, असे उद्गारही मोदी यांनी यावेळी काढले.
काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखत आहेत
2014 च्या आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यावर आम्ही या प्रकल्पाचे काम सुरू केले. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मोदी म्हणाले. मात्र या प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांचा कडाडून विरोध आहे याचा साधा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला नाही.
माफी ऐवजी फडणवीसांनी राजकारण केले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांची आणि तमाम शिवभक्तांची माफी मागितली. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनीही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची शंभर वेळा माफी मागतो असे सांगितले, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र माफी मागण्याचे औदार्य दाखवले नाही. त्यांच्यासह राज्यातल्या एकाही भाजप नेत्याने याप्रकरणी माफी मागितली नाही. फडणवीसांनी तर या घटनेचे राजकारण करू नका असे उफराटे सल्ले विरोधकांना दिले. राजकोट येथील घटनास्थळाला शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली असता खासदार नारायण राणे यांनी अरेरावी केली आणि घरातून खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकीन अशी धमकीही दिली. मात्र फडणवीसांनी राणेंच्या या अरेरावीचेही समर्थनच केले.
दिल्लीच्या दबावापोटीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी
शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने माफी मागितली नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱयात माफी मागतील असे आधीच ठरले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा राजकीय फायदा मिळेल असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका गटाने मोदींना दिला होता. त्यानुसार मोदी यांनी आज माफी मागितली. पण मोदींच्या माफीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही तर सरकारचे काही खरे नाही आणि त्याचाही फटका निवडणुकीत बसू शकतो हेसुद्धा भाजपवाल्यांनी जाणले होते. त्यामुळे थेट दिल्लीतूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आला होता. त्याच दबावापोटी त्यांनी गुरुवारी हात जोडून माफी मागितली होती, असे सूत्रांकडून समजते.
माफीचा जुमला नको, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या! महाविकास आघाडी आक्रमक
मालवणच्या राजकोटवरील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर माफी मागितली. मात्र दुर्घटनेच्या पाच दिवसांनंतर मोदींना जाग आली का, असा संतप्त सवाल सर्वत्र केला जात आहे. राजकीय वर्तुळातही मोदींच्या माफीवरून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही माफी म्हणजेही आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला जुमला आहे, अशी टीका होत आहे. माफीचा जुमला नको, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.