शैक्षणिक सहल काढण्याची गरज आहे का? मुख्याध्यापक संघटनेचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिक्षण विभागाच्या अटी आणि नियमावलींच्या कचाट्यात सापडलेली शैक्षणिक सहल काढण्याची खरंच गरज आहे का, असा सवाल मुंबई मुख्याध्यापक संघटनेने केला आहे. शैक्षणिक सहलीवेळी दुर्घटना घडल्यास त्यास मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरणाऱ्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढलेल्या नियमावलींनाही संघटनेने विरोध केला आहे.

नोव्हेंबरनंतर शालेय सहलींना सुरुवात होते. त्यानुसार पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहलीसाठी परवानगीचे प्रस्ताव येत आहेत. या प्रस्तावांना शहानिशा न करता मान्यता दिल्यास आणि पुढे एखादी दुर्घटना घडल्यास परवानगी देणाऱ्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाही शाळांच्या माहितीसाठी पुणे विभागाने सहल नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत दुर्घटनेला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी स्टॅम्पपेपरवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी हमीपत्रही द्यायचे आहे. शिक्षण विभागाच्या यानियमांवलीविरोधात मुख्याध्यापक संघटना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र देणार असून शैक्षणिक सहल काढण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी करणार आहे.

सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती मिळते
शालेय सहली नियमांच्या कचाट्यात सापडल्यानेच सहलींचे आयोजन करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहेच पण त्यासाठी फक्त मुख्याध्यापकांनाच दोषी ठरविणे चुकीचे आहे. सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेट या माध्यमातून विद्यार्थ्यांना बरीच माहिती मिळते. त्यामुळे यापुढे सहलींच्या आयोजनाची सक्ती शाळांवर करूच नये,असेही रेडीज म्हणाले.