Pitru Paksha 2021 – पितृपक्ष वाईट नसतो!

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते

आपले पूर्वज जर आपल्याला आशीर्वाद द्यायला खाली उतरणार असतील तर तो महिना अशुभ कसा असू शकतो ? आपला सनातन वैदिक धर्म हा माणसाला माणसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागण्याची शिकवण देत असतो. त्यामुळे हा धर्म म्हणजे एक जीवन पद्धती बनली आहे. दान, कृतज्ञता, सेवा, प्रेम, सहिष्णुता इत्यादी अनेक वैशिष्ट्ये या जीवन पद्धतीमध्ये सामावलेली आहेत. या संस्कृतीवर इतकी आक्रमणे होऊनही ही जीवन पद्धती नष्ट झालेली नाही. इतकी ती आपल्या रक्तात भिनलेली आहे. आज आपण याच जीवन पद्धतीत सांगितल्या गेलेल्या पितृपक्षाविषयी माहिती करून घेणार आहोत.

हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. शेतात धान्य तयार होत असते. भाद्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ किंवा ‘महालय पक्ष’ असे म्हणतात. या दिवसात पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला असेल ती तिथी भाद्रपद कृष्ण पक्षात अपराण्हकाली असेल त्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहायची असते. ज्या आपल्या पूर्वजांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, घरदार दिले, शेती जमीन दिली त्या पूर्वजांना कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. या दिवसांत आपले मृत पूर्वज म्हणजे ‘पितर‘ भूलोकांत येतात अशी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, श्रद्धा आहे. उत्तर आकाश हे देवांचे आणि दक्षिण आकाश हे पितरांचे असते अशीही एक कल्पना आहे. 23 सप्टेंबर रोजी सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. म्हणून हे पितरांचे स्मरण करण्याचे दिवस म्हणून मानले जात असावे. सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत महालय-श्राद्ध करायला सांगितलेले आहे.

श्राद्ध हे श्रद्धेने करावयाचे असते. या काळात पक्ष्यांना अन्न खायला देऊन ते करता येते. गरीबांना भोजन देऊनही ते करता येते. एखाद्या सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱया संस्थेला मदत करूनही ते करता येते. इथे आपण या गोष्टी किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचे असते. पूर्वजांचे स्मरण कोणत्या गोष्टीने करावयाचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे.

निव्वळ गैरसमज

पितृपक्षाचे हे पंधरा दिवस वाईट कसे असू शकतील ? या दिवसांत शुभकर्मे करू नयेत, विवाहाची बोलणी करू नयेत, नवीन घर घेऊ नये, मौल्यवान वस्तू खरेदी करू नयेत, सोने खरेदी करू नये असा जो समज आहे तो एक निव्वळ गैरसमज आहे. पितृपक्षामध्ये जर आपले पूर्वज पृथ्वीतलावर येत असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वादच मिळेल ना? हां, पण जर ते जिवंत असताना आपण त्यांना त्रास दिला असेल तर मात्र अशा लोकांना पितरांची भीती वाटणे स्वाभाविक आहे. पितर हे आशीर्वाद देत असतात, आपले रक्षण करीत असतात असे ऋग्वेदात म्हटलेले आहे. त्यामुळे पितृपक्षाचे हे दिवस वाईट नसतात.

मकर संक्रांत वाईट, पौष महिना वाईट, चंद्रग्रहण वाईट, सूर्य ग्रहण वाईट तसेच पितृपक्ष वाईट असे जे समज आहेत ना, ते निव्वळ गैरसमज आहेत. त्यामुळे पितृपक्षात विवाहाची बोलणी, गृहखरेदी, मोटारगाडी खरेदी, सोने खरेदी वगैरे करताना भूतलावर आलेल्या आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार असल्याने या गोष्टी करण्यास काहीही हरकत नाही. पितृपक्षात कोणी आजारी झाले तर ‘पितृपक्ष आहे‘ म्हणून आपण थोडेच थांबणार आहोत. पितृपक्षात बाकी इतर सर्व गोष्टी चालूच असतात. हॉस्पिटलस्मध्ये ऑपरेशन्स चालू असतात, विमान वाहतूक सुरळीतपणे सुरू असते, शेतातील धान्य घरात आणण्याचे काम चालू असते, प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांचे संशोधन चालू असते, कारखान्यातून काम चालू असते, लोक प्रवास करीत असतात. मग गृहखरेदी, सोने खरेदी इत्यादी गोष्टी करावयाच्या नाहीत हे कसे? पूर्वी लोकसंख्या कमी होती. जीवनात निवांतता होती. स्पर्धा नव्हती. आता लोकसंख्या वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे, सर्वत्र गर्दी – धावपळ आहे. मिळणारा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. मग थांबून कसे चालेल? पूर्वापारपासून चालत आलेल्या या गैरसमजुती मनातून काढून टाकावयास हव्यात. आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा मलाही अभिमान आहे, परंतु या कालबाह्य झालेल्या समजुती आपण काढून टाकायलाच हव्यात.

मागच्या पिढीतील लोक लहानपणी आपल्या पालकांना प्रश्न विचारू शकत नव्हते. पुढची पिढी ही हुशार आहे. आपल्या घरातील मुले, नातवंडे जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना समजावून सांगायलाच पाहिजे की, पितृपक्षातील हे दिवस वाईट नसतात. अशुभ नसतात. अर्थात पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली ही गैरसमजूत एका दिवसात बदलणार नाही हे मलाही मान्य आहे, पण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तरनक्कीच यात बदल होऊ शकेल. मी स्वतः नेहमी सामाजिक संस्थांना व गरजू , गरीब लोकांना मदत करून माझ्या पितरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो . मग तुम्ही या पितृपक्षात काय करणार ? हे दिवस वाईट म्हणून घरात बसणार की, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून समाजातील गरीब, गरजू लोकांना मदत करणार?

लेखक खगोल अभ्यासक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या