मराठी अभिनेत्री राजकारणात उतरणार, 7 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

4661

एका मराठी अभिनेत्रीने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जुलै रोजी ही अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या अभिनेत्रीप्रमाणे अन्य काही कलाकारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कलाकारांमध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडेकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचाही समावेश असल्याचे कळते आहे. या नावांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.

या अभिनेत्रीचे नाव प्रिया बेर्डे असून त्या पुण्यातून लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचे काम पाहात आहेत. पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांसाठी भरीव करण्याची आपली इच्छा असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोककलावंतांना बराच त्रास आणि हालअपेष्टा सहन करावा लागत आहे. ऐरवीही त्यांच्या अनेक समस्या असतात आणि त्या देखील सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सामना ऑनलाईनशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. या विभागाद्वारे चित्रपट निर्मात्यांच्या तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्याही अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या