प्रिया पाटील या प्रथितयश चित्रकार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी अपूर्व यश संपादन केले आहे. त्यांच्या कलात्मक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे विणकाम. प्रिया पाटील यांच्या सुतळीच्या विणकामाचे हे कलात्मक आणि सांस्कृतिक आगळेपण एका वेगळ्या कलाविश्वाची सफर घडवून आणते.
सुतळ, गोणपाट, बारदान हीच काय आपल्याला असलेली तागाची ओळख. या वस्तू गुंडाळण्यासाठी किंवा बांधण्यासाठी दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. तागाचा धागा म्हणजे ‘सुतळ’ याला कलात्मक साज कलाकार प्रिया पाटील यांनी दिलेला आहे.
प्रिया पाटील या प्रथितयश चित्रकार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी अपूर्व यश संपादन केलेलं आहे. प्रिया पाटील यांच्या कलात्मक पैलूंपैकी एक पैलू म्हणजे विणकाम. सुयांच्या सहाय्याने लोकर आणि धाग्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक अप्रतिम कलाकृती निर्माण केलेल्या आहेत.
तागाच्या धाग्याचा म्हणजे सुतळीचा वापर करून एक नवीन प्रयोग त्यांनी केला आहे. सुतळीच्या माध्यमातून सुयांच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानी संस्कृतीच्या चिन्हांची कलाकृती निर्माण केलेली आहे. विशेषकरून मराठी संस्कृतीची छाप त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसून येते.
महाराष्ट्राच्या आभूषण संस्कृतीतील ‘नथ’, चौसष्ट कलांची देवता ‘श्री गजानन’, पूजेतील ‘कलश’, मंगलकारी ‘स्वस्तिक’, मंदिराच्या गाभाऱयातील भगवान विष्णूने वरदान दिलेले कूर्मावतारी ‘कासव’, लक्ष्मीचे वाहन आणि समृद्धीचे संकेत शुभचिन्ह ‘घुबड’, वैभव आणि ऐश्वर्य यांची भरभराट घेऊन येणारी ‘लक्ष्मीची पावलं’, समुद्रमंथनातून प्रकट झालेला आणि नादस्वराचे प्रतीक ‘शंख’ या कलाकृती अध्यात्माची निरामय ओढ निर्माण करतात.
सूर्याची भव्यता दर्शविणारे ‘सूर्यफूल’, समृद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक आणि हिंदुस्थानचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’, सागरी संपत्तीचे प्रतीक ‘मत्स्य’, नयनरम्य ‘मोरपीस’ या कलाकृती निसर्गाची ओढ निर्माण करतात.
मंगल प्रसंगी दारावरची ‘आंब्याची डहाळी आणि झेंडूची फुलं, दारासमोरील अंगणातली गेरूवर सारवलेली ‘रांगोळी’ महाराष्ट्राच्या सणसमारंभाची आठवण करून देतात. या सर्व कलाकृती सुतळीपासून विणकामाने तयार केलेल्या आहेत.
प्रिया पाटील यांच्या सुतळीच्या विणकामाचे हे कलात्मक आणि सांस्कृतिक आगळेपण एका वेगळ्या कलाविश्वाची सफर घडवून आणते.
प्रिया पाटील यांच्या सुतळीपासून तयार केलेल्या या कलाकृतींचे प्रदर्शन दिनांक 11 ते 25 जून या कालावधीत राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय, नवी दिल्ली येथे होत असून हिंदुस्थानातील 30 कलाकार या ‘एकजूट’ प्रदर्शनात आपली कला सादर करीत आहेत. या प्रदर्शनाचे संयोजन प्रा. डॉ. मंजिरी ठाकूर आणि त्यांच्या ‘वारसा’ या संस्थेने केले आहे.