मी आता थकलो आहे! हेरा फेरी – 3 नंतर मी निवृत्ती घेणार – दिग्दर्शक प्रियदर्शन 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते, विनोदी आणि कौटुंबिक नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले प्रियदर्शन यांनी आत्तापर्यंत प्रेक्षकांना अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. हेरा फेरी, हंगामा, चुप चुपके यांसारख्य़ा चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता त्यांचे चित्रपट शंभरीचा टप्पा गाठणार आहेत. या दरम्यान त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यांचे काही उर्वरित चित्रपट पूर्ण केल्यानंतर ते निवृत्ती घेण्याची तयारी करत आहेत.

प्रियदर्शन यांनी निवृत्तीबद्दल काय सांगितले?

दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी नुकतेच अक्षय कुमार, परेश रावल आणि वामिका गब्बी यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. यावेळी ‘हेरा फेरी ३’ आणि ‘हैवान’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटांची घोषणा करताना प्रियदर्शन यांनी हे प्रोजेक्ट त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे प्रकल्प असू शकतात, असे म्हटले. ‘हे चित्रपट पूर्ण केल्यानंतर, मी निवृत्त होणार आहे, कारण मी आता थकलो आहे, असे ते म्हणाले.

प्रियदर्शन सध्या त्यांच्या ‘हैवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘हैवान’ हा प्रियदर्शनचा 99 वा चित्रपट आहे. रिपोर्टनुसार, यामध्ये साऊथ सुपरस्टार मोहनलाल देखील एका छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रियदर्शनने मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट काम केले आहे. हेरा फेरी, हंगामा, चुप चुपके, भूल भुलैया यासारखे त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.