
आज लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. “देशात एकच व्यक्ती अशी आहे, जी या शक्तिशाली सरकारसमोर झुकली नाही आणि ती म्हणजे राहुल गांधी,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षांत राहुल गांधी यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यात आले, त्यांच्यावर अनेक आरोप झाले आणि त्यांना त्रास देण्याचे सर्व प्रयत्न झाले. मात्र इतक्या दबावानंतरही राहुल गांधी सत्याच्या मार्गावरून हटले नाहीत. “त्यांनी कधीही सत्तेसमोर गुडघे टेकले नाहीत, कारण त्यांचा लढा हा देशातील सामान्य जनतेसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरले. त्या म्हणाल्या की, सरकार केवळ मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रा काढून लोकांचे प्रश्न समजून घेतले, पण सरकारने केवळ द्वेषाचे राजकारण केले, असा आरोपही त्यांनी केला.
संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, “भाजपने राहुल गांधी यांना रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत आणि सोशल मीडियावर मोहिमा सुरू केल्या आहेत, पण सत्य सर्वांसमोर आहे. आज लोक पाहत आहेत की, राहुल गांधी सत्य बोलण्यास घाबरत नाहीत. म्हणूनच सत्तेत असलेले लोक त्यांच्या सत्याला घाबरतात. आपले शेतकरी दुःखात आहेत, देशाची सर्व संपत्ती अदानी आणि अंबानींना देण्यात आली आहे. परंतु जेव्हा याबद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा सरकारमधील कोणीही उत्तर देत नाही. संसदेत वंदे मातरमची चर्चा होते आणि नेहरू आणि इंदिरा गांधींचा उल्लेख केला जातो, परंतु महागाई, बेरोजगारी आणि व्यापार करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही.”

























































