प्रो कबड्डी लीगच्या मंगळवारी सीझन 11साठी ‘एलिट रिटेन्ड प्लेअर्स’, ‘रिटेन्ड यंग प्लेअर्स’ आणि ‘एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स’ची घोषणा करण्यात आली. प्रत्येक फ्रँचायझीने अनुभवी खेळाडूंचा भक्कम गट कायम राखला आहे. प्रो कबड्डी लीग सीझन 11च्या लिलावामध्ये अन्य काही खेळाडूंना विकत घेऊन आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दबंग दिल्ली संघाने आशू मलिक आणि नवीन कुमार यांची जोडी कायम ठेवली आहे. दरम्यान, सीझन 10 मधील मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू पुरस्कार पटकवणाऱ्या अस्लम इनामदारला पुणेरी पलटण संघाने कायम ठेवले आहे. याशिवाय, जयपूर पिंक पँथर्सने त्यांचा स्टार रेडर अर्जुन देशवालला कायम ठेवले आहे. एलिट रिटेन्ड प्लेयर्स (इआरपी) श्रेणीतील 22 खेळाडू, रिटेन्ड यंग प्लेयर्स (आरवायपी) श्रेणीतील 26 खेळाडू आणि विद्यमान नवीन तरुण खेळाडू (इएनवायपी) मधील 40खेळाडू अशा एकूण 88 खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले. कायम न राहिलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत, परदीप नरवाल, मनिंदर सिंग, फझल अत्राचली आणि मोहम्मद रेझा शादलुई चियानेह यांसारख्या ‘स्टार’ खेळाडूंचा समावेश आहे, ते मुंबईत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नशीब आजमावणार आहेत.
पीकेएल सीझन 11 खेळाडूंच्या लिलावात देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी केली जाणार आहे. अ’श्रेणी रुपये 30 लाख, ‘ब’ श्रेणी– 20 लाख, ‘क’ श्रेणी– 13 लाख, ‘क’ श्रेणी – 9 लाख या प्रत्येक श्रेणीसाठी आधारभूत किमती आहेत. सीझन 11 प्लेयर पूलमध्ये खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या दोन अंतिम फेरीतील 24 खेळाडूंसह 500हून अधिक खेळाडूंचा समावेश असेल. प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघासाठी एकूण पाच कोटी रुपयांची मर्यादाअसणार आहे.