पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवार म्हणून सामोरे जाणाऱ्या विद्यमान आमदारांच्या विरोधात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ मतदारसंघातील इतर सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यामुळे या विद्यमान आमदारांच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
खेड विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्र बैठक घेऊन मोहिते यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शिंदे गटाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातदेखील हीच स्थिती असून आमदार अतुल बेनके यांना सर्वपक्षीय विरोध होताना दिसत आहे. बेनके हे गेले दोन-तीन आठवडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वारंवार भेटण्याचा आणि कुटुंबातील व्यक्तींना पवार यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील हे अडचणीत आहेत. गेल्या पस्तीस वर्षांत प्रथमच मतदारसंघात विरोध होत असून नकारात्मकता वाढली आहे. अनेक वर्ष मंत्री असूनही मतदारसंघातील पाणी, शेतीचा प्रश्न सोडवता आला नाही, उद्योग व्यवसाय त्याचबरोबर एमआयडीसी उभी करणे, रस्त्यांचे प्रकल्प थांबले तसेच शिरूर तालुक्यातील ३९ गावांमधूनही मोठा विरोध वाढला आहे.
मावळमध्ये विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सुनील शेळके यांना भाजपकडून थेट विरोध केला जात आहे. त्याचबरोबर अजित पवार गटातील बापू भेगडे हेदेखील तीव्र इच्छुक झाल्याने शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांचे आणि शेळके यांचे जमत नसल्याने मावळमध्ये महायुतीत सगळे आलबेल नाही हे समोर आले आहे.