मोदींवरील टीकेचा संदर्भ दिल्यामुळे ज्येष्ठ प्राध्यापकाने गमावली नोकरी, माफी मागण्याऐवजी स्वीकारली मुदतपूर्व निवृत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका खपवून न घेणाऱया यंत्रणांच्या दमनशाहीला साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधील एक ज्येष्ठ प्राध्यापकही बळी पडले आहेत. पीएचडीसाठी इच्छुक असलेल्या त्यांच्या एका विद्यार्थ्याने आपल्या प्रबंधात जगप्रसिद्ध विचारवंत नॉम चॉम्स्की यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा संदर्भ दिल्यामुळे विद्यापीठातील हे प्राध्यापक आणि काही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी संबंधित विद्यार्थी व विद्यापीठात गेली 13 वर्ष महत्त्वाच्या जबाबदाऱया पार पाडणारे 62 वर्षीय प्राध्यापक शशांक परेरा यांना नोटिस बजावण्यात आली होती. या विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाची माफी मागितली. परेरा यांनी मात्र तसे करण्यास नकार देत मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मोदी कट्टर हिंदुत्ववादी परंपरेतून आले असून ते भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाही मोडून काढून तिथे हिंदू तंत्रसत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य एका मुलाखतीत चॉम्स्की यांनी केले होते. हा उल्लेख केला म्हणूनच विद्यार्थ्याने माफी मागितली. पण माझ्या सहकाऩयांनीही या प्रकरणी मौन बाळगले याचा खेद वाटतो, असे प्रा. परेरा म्हणाले

काय घडले होते…

प्राध्यापक व नावाजलेले सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ शशांक परेरा हे साऊथ एशियन युनिव्हर्सिटीत तब्बल 13 वर्षं समाजशास्र शिकवत होते. 31 जुलै हा त्यांचा विद्यापीठातला शेवटचा दिवस होता. निवृत्तीनंतर महिन्याभराने त्यांनी विद्यापीठाकडून कशा प्रकारे दडपण आणण्यात आले याची पोलखोल केली आहे. मोदींवर व एनडीएवर टीका करणारा मुलाखतीतला संदर्भ असणाऱया पीएचडी प्रस्तावपत्राला त्यांनी मंजुरी दिली, असा आरोप करत परेरा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली होती. संबंधित पीएचडी उमेदवार विद्यार्थ्याने विद्यापीठ प्रशासनाची जाहीर माफी मागितली असली तरी कारवाईच्या बडग्यासमोर न झुकता परेरा यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेण्याचा पर्याय निवडला.