राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूर मधील घटनेमुळे राज्यातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमी (दहीहंडी) उत्सव आहे. यावेळी कोणतीही चुकीची घटना होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
गोकुळाष्टमी उत्सव 26 ऑगस्ट 2024 व 27 ऑगस्ट 2024 या कालावधीत साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी फेकणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या रक्षणासाठी नमूद केलेल्या काही कृत्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे पोलीस उपायुक्तांच्या पत्रकात म्हटले आहे.
मुंबईचे पोलीस उप आयुक्त (अभियान) गणेश गावडे यांनी एक पत्रक जारी केले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम 37 च्या पोटकलम (1) चे खंड (सी), (ई) आणि (एफ) कलम 2 चे पोटकलम (6), कलम 19 चे पोटकलम (2) याद्वारे बहाल केलेल्या शक्तीचा वापर करून संपूर्ण मुंबईमध्ये खालील कृत्यांवर बंदी घालत आहे.
(1) सार्वजनिक रित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.
(2) हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.
(3) पदचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे
(4) रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फकणे
हा आदेश 26 ऑगस्ट 2024 रोजीचे 00.01 वा. पासून ते दि. 27 ऑगस्ट 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत लागू राहणार आहेत.