प्रॉपर्टी कार्डमधील फेरफार आता घरबसल्या ’ऑनलाईन’, मुंबईतील 30 लाख मालमत्ताधारकांना दिलासा,  45 प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात मिळकत पत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार आता घरबसल्या पूर्णपणे ऑनलाईन मिळणार आहेत. राज्य शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे मुंबईतील 30 लाख मालमत्ताधारांना दिलासा मिळाला आहे. त्यांना महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. मुंबईत ही सुविधा प्रथमच सुरू करण्यात आली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा नियम 47 अन्वये विधानसभेत यासंदर्भात निवेदन केले. ‘मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संधारणाची पद्धत वेगळी असल्याने मुंबईत संगणकीकरणात काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, जनतेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने यावर मार्ग काढला आहे. आता मुंबईतील 19 महसूल विभाग आणि 4 नगर रचना योजनांमधील एकूण 27 हजार 847 संगणकीय मिळकतपत्रिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.

घरबसल्या अर्जाची सुविधा आणि ट्रॅकिंग

फेरफारसाठी अर्ज करण्यासाठी एनआयसी पुणे या संस्थेने नागरिकांसाठी epsitmumc.mahabhumi.gov.in हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या पोर्टलमुळे नागरिकांना घरबसल्या अर्ज भरता येणार असून, त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि कामात गती येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

45 प्रकारचे फेरफार ऑनलाईन

मुंबईत 45 प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. त्यात खरेदीखत, वारस नोंद, बक्षिसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन प्रक्रिया यांचा समावेश आहे. नागरिकांनी आता आपल्या मालमत्तेच्या कामांसाठी mahabhumi.gov.in किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.