दोन कोटी 91 लाख किमतीचा ऐवज मूळ मालकांना केला परत, पोलिसांची चांगली कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परिमंडळ-10 अंतर्गत येणाऱया पोलिसांनी आज तब्बल 490 तक्रारदारांना सुखद धक्का दिला. चोरीला तसेच हरविलेल्या त्या तक्रारदारांचा किमती ऐवज परत मिळवून त्यांना आज परत देण्यात आला. दोन कोटी 91 लाख रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी मूळ मालकांना परत देण्याची कामगिरी पार पाडली.

परिमंडळ-10 अंतर्गत येणाऱया मेघवाडी, जोगेश्वरी, अंधेरी, पवई, एमआयडीसी, साकीनाका या पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, फसवणूक, हरविले, सायबर फसवणुकीतून नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस ठाण्याच्या पथकांनी कसून शोध घेत मौल्यवान वस्तू व दागिने, रोकड, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा तब्बल दोन कोटी 91 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल शोधून काढून तो मूळ मालकांना परत केला.