
सामना ऑनलाईन । बोईसर
पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात तारापूर एमआयडीसीतील प्रदुषणकारी कारखान्यांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवशक्ती सामाजिक संघटनेनच्या वतीने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चाला कुणबी सेनेने पाठींबा देत मोर्चामध्ये सहभाग घेतला. तसेत पालघरमधील पत्रकार व इतर सामाजिक संघटनांनी देखील मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. प्रदुषणकारी कारखान्यांमुळे परिसरात शेतीचे नुकसान, मासे मरणे, तसेच नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे प्रदुषणकारी कारखानदारांबरोबर साटेलोटे असल्याचा आरोप करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
तारापूर एमआयडीसी मधील प्रदुषणकारी कारखान्यांमुळे, रासायनिक कचऱ्यामुळे परिसरातील शेतीची सुपिकता नष्ट झाली आहे. तसेच मासेमारीवरही मोठा परिणाम झाला आहे. दुर्गंधीयुक्त वायु मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असल्याने अक्षरश: नाक मुठीत घेऊन जावं लागत आहे. नियम धाब्यावर बसवून घातक कारखाने सुरू असून त्यामुळे अनेक वेळा स्फोट होऊन अनेक निष्पाप कामगारांचा बळी गेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मात्र अनेक वेळा तक्रारी करूनही जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा आणि लवकरात लवकर प्रदुषणकारी कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


























































