वाढवण बंदर, बुलेट ट्रेनविरोधात आदिवासींचा विराट मोर्चा; जल, जंगल, जमीन लुटणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध एल्गार, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

महाविनाशकारी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा महामार्ग यांसह भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱ्या आणि जमीन, जंगल, जल लुटणाऱ्या घातक प्रकल्पांविरोधात आज हजारो आदिवासींचे लाल वादळ घोंघावले. डहाणूच्या चारोटीतून सरकारविरोधात गगनभेदी घोषणा देत या आदिवासींच्या मोर्चाने पालघरच्या दिशेने कूच केले. जंगल, जमीन, जल लुटणाऱ्या धनदांडग्यांविरोधात आरपारचा लढा पुकारत हा मोर्चा उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीवर आता धनिक व बिल्डरांचा डोळा असून वाढवण बंदराला यापूर्वीच मच्छीमारांनी विरोध केला. त्याशिवाय विमानतळ, मोरबे बंदर, टेक्सटाईल पार्क अशा माध्यमातून विविध प्रकल्प लादण्याचा डाव सरकारने आखला असून त्याविरोधात आदिवासी बांधवांसह, डायमेकर

वाढवण बंदरविरोधातही मच्छीमारांचे आंदोलन
एकीकडे चारोटीहून आदिवासींचे लाल वादळ घोंघावले असतानाच आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढवण बंदरविरोधातही मच्छीमारांनी आंदोलन छेडले. एक-दो.. एक-दो.. वाढवण बंदर फेक दो.. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या बंदरामुळे मच्छीमार क्षेत्र उद्ध्वस्त होणार असून हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले जाणार आहे. त्यामुळे तातडीने हे बंदर रद्द करावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या आंदोलनात वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, आदिवासी भूमी सेना, मुरबे बंदरविरोधी संघर्ष समिती अशा विविध संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

कामगार, शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार एकवटले आहेत. माकपचा हा ऐतिहासिक मोर्चा चारोटी येथून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार अशा विविध भागांतून सुमारे १६ ते २० हजार आदिवासी त्यात सहभागी झाले आहेत.

तळपत्या उन्हाची पर्वा न करता हा मोर्चा निघाला. ३० किलोमीटरचा पायी प्रवास करून मनोरमार्गे मासवण येथे हे वादळ आज संध्याकाळी धडकले, तेथे रात्री मुक्कामही करण्यात आला.

मोर्चामध्ये चारोटी येथील ९० वर्षाच्या कमळीबाई यांनीदेखील सहभाग घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी निघालेल्या नाशिक-मुंबई लाँगमार्चमध्येसुद्धा त्या सामील झाल्या होत्या.

आज निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व माकपचे आमदार विनोद निकोले, अशोक ढवळे, मरीयम ढवळे, शेतकऱ्यांचे नेते अजित नवले, डॉ. किरण गहलायांच्यासह अनेक नेते करीत आहेत.

या आहेत मागण्या
बनपट्ट्यांचे दावे तातडीने निकाली काढा
इनाम देवस्थान व गावरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर कराव्यात
पेसा व इतर रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत
गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा
जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार थांबवावा
धरणांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्या
प्रकल्पग्रस्तांना आधीच नुकसानभरपाई द्यावी
रेशन वितरणातील भ्रष्टाचार थांबवा
जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदे तातडीने भरावीत
वाढवण बंदर व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करा