मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा; विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र

प्रातिनिधीक फोटो

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या काळात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्प्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना करावा लागला. त्यामुळे मतमोजणीसाठी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे.

राज्यातील बहुतेक भागात उष्णतेची लाट आहे. तापमान 40 ते 47 अंशापर्यंत पोहचले आहे. रखरखत्या उन्हात नागरिकांना मतदानासाठी रांगा लावून तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगातर्फे पिण्याच्या पाण्याची सोय तसेच निवाऱ्यासाठी सावलीची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे नागरीकांकडून निवडणूक आयोगाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. काही राज्यांमध्ये मतदारांना व शासकीय कर्मचाऱ्यांना उष्माघाताने आपले प्राण गमवावे लागले आहेत, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

या लोकशाहीच्या महोत्सवाची सांगता म्हणजेच मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अद्याप उष्णतेची लाट असून तापमान 45 डिग्री सेल्सीअसच्या आसपास आहे. मतदानादरम्यान असुविधांचा कटू अनुभव जनतेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मतमोजणी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या व्यक्तींमध्ये उदासीनता व भितीचे वातावरण आहे. त्यामुळे मंगळवारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांना निवडणूक आयोगाने अंतर्भुत केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व सोयी सुविधा (पाणी, पंखे, कुलर, आरोग्य सुविधा इत्यादी) उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.