
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत 238 वातानुकूलित लोकल गाडय़ांच्या खरेदीसाठी 4 हजार 826 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. त्याशिवाय विविध मेट्रो प्रकल्पांसाठी 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता दिली आहे.
ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुण्यातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडीच्या (मार्गिका क्र. 2) विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-4 (खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी), नळ स्टॉप वारजे – माणिकबाग (उपमार्गिका) आणि नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-2 या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज घेण्यासही मान्यता देण्यात आली.
आणिक डेपो – वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रोला वेग
मुंबईतील आणिक डेपो – वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-11 प्रकल्पास आणि त्यासाठी येणाऱया 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे.
ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दरम्यानचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड) उभारण्यासाठी 6 हजार 363 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी-भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येईल. या मार्गालगतची अतिरिक्त जमीन व्यावसायिक वापरासाठी संपादित करण्यास तसेच मार्गिकेखालील शासकीय मालकीची जमीन नाममात्र दराने सिडको महामंडळास देण्यासही मान्यता दिली.
मुंबईसाठी 238 एसी लोकल
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-3 आणि 3 अ या प्रकल्पात वातानुकूलित 238 उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या खरेदी करण्यासाठी 4 हजार 826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड तसेच राज्य सरकारच्या हिश्श्यातून देण्यास मान्यता मिळाली.
महामुंबईतील नव्या रेल्वे मार्गिका
मुंबई नागरी परिवहन प्रकल्पा अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून प्रस्तावित 136.652 कि.मी. लांबीच्या आणि 14 हजार 907 कोटी 47 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या अंतर्गत बदलापूर-कर्जत दरम्यान तिसऱया आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांची उभारणी, आसनगाव ते कसारा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका आणि पनवेल ते वसई दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
पुणे ते लोणावळा तिसरी, चौथी रेल्वे मार्गिका
पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत होईल. सुमारे 63.87 कि.मी. लांबीच्या आणि 17 स्थानके असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 5 हजार 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणार आहे.
पुणे मेट्रोवर दोन नव्या स्थानकांना मंजुरी
पुणे शहरात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके उभारण्यास मान्यता दिली. कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतरण करण्यास आणि यासाठीच्या 683 कोटी 11 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.