थराराच्या पहिल्याच टप्प्यात मोठा धक्का! ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये 70 सायकलपटू एकमेकांवर आदळले

देशात प्रथमच होत असलेल्या आणि प्रचंड चर्चेत असलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल शर्यतीच्या पहिल्याच टप्प्यात थरारक आणि धक्कादायक घटना घडली. मुख्य गटाच्या दुसऱया ताफ्यातील सायकलपटूंची एकमेकांशी जोरदार धडक होऊन तब्बल 70 खेळाडू एकाचवेळी रस्त्यावर कोसळले. या अपघातामुळे संपूर्ण शर्यतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद मार्ग आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने धावणाऱया सायकलपटूंना अचानक आलेल्या वळणामुळे सावरता आले नाही. आघाडीवरील सायकलपटूचा ताबा सुटताच मागून येणारे खेळाडू एकामागोमाग एक एकमेकांवर आदळले आणि काही क्षणांतच रस्त्यावर सायकली आणि खेळाडूंचा ढीग साचला.

यूसीआयचे अधिकारी आणि वैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी सायकलपटूंना प्राथमिक उपचार देत सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली.

सुदैवाने जीवितहानी टळली

या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मात्र मलेशिया राष्ट्रीय संघाचा क्रमांक 161 असलेला अब्दुल हलील मोहम्मद इझ्झात हा एकमेव सायकलपटू शर्यत पूर्ण करू शकला नाही. उर्वरित दोन अपघातग्रस्त सायकलपटूंनी सायकल बदलून पुन्हा शर्यतीत सहभाग घेतला आणि जिद्दीचे दर्शन घडवले.