पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव आवश्यक संचालक संख्येच्या अभावी नामंजूर झाला. ठराव पारित होण्यासाठी 18 पैकी दोन तृतीयांश म्हणजे 12 संचालकाचे मतदान होणे आवश्यक होते. मात्र, 10 संचालकांनीच ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर आठ संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे हा ठराव नामंजूर झाला. आता सभापती दिलीप काळभोर यांच्याविरोधात 6 महिने अविश्वास ठराव आणता येणार नाही.
बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर हे संचालक मंडळातील सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करत आहेत. त्यांनी त्यांच्या सभापती पदाच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे नुकसान होत आहे. यामुळे उपसभापती सारिका हरगुडे, मनिषा हरपळे, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रय पायगुडे, शशिकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, प्रकाश जगताप या दहा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.
या ठरावावर जिल्हाधिकार्यांनी शनिवारी (दि.31) बाजार समितीत विशेष सभा लावली. या सभेसाठी जिल्हाधिकारी दिवसे यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांना प्राधिकृत केले होते. जिल्हा उपनिबंधक जगताप यांनी सभा घेत अविश्वास ठरावावर चर्चा होऊन मतदान झाले. सभेला सचिव डॉ.राजाराम धोंडकर उपस्थित होते.
अविश्वास ठरावावर चर्चा होऊन मतदान झाले. कायद्यातील तरतुदीनुसार अविश्वास ठरावाच्या बाजूने दोन तृतीयांश म्हणजे 12 संचालकाचे मतदान होणे आवश्यक होते. 18 पैकी 10 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभापतींच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर होऊ शकला नाही. कायद्यातील तरतुदीनुसार आता पुढील 6 महिने अविश्वास ठराव आणता येत नाही, असे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी सांगितले.
अविश्वास ठरावाला सभापती दिलीप काळभोर सामोरे गेले नाहीत. समितीत पारदर्शी कारभार होत नाही. बैठकीत उत्तरे द्यावी लागली असती त्यामुळे सभापतींनी यांनी तोंड लपवले. 18 पैकी 10 संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. बहुमत लक्षात घेता बाजार समितीत सभापती हे अल्पमताचे असल्याचे बाजार समिती संचालक प्रशांत काळभोर यांनी सांगितले.
बाजार समितीत सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच पारदर्शी कारभार सुरू आहे. सभेचे विषय मंजुर होताना या दहा संचालकांनी संबंधित विषयांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे समितीच्या कारभाराबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, असे बाजार समिती सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.