Pune News : अवकाळी पावसाचं थैमान; आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला लाखो रुपयांचा फटका

देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे. मात्र दुसरिकडे पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावून घेतला आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपासून ढगांच्या गढगढाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाचा फटका मंचर, पिंपळगाव, खडकी, निरगुडसर ,पारगाव, काठापूर लाखनगाव या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झाले आहे. टरबूज, कलिंगड, फ्लॉवर, टोमॅटो, फळ, भाजीपाला सारख्या उन्हाळी पिकांचे तसेच आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांच फटका बसला आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र बांगर यांच्या दोन एकर फ्लॉवर पिकांचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. आचारसंहितेचा नियम बाजूला ठेवून जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.