
प्रसिद्ध सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहार, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रतीक नगरकर (वय 35, रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलकंट ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन इरप्पा डांगे (वय 37, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्मसन म्हणून काम करत होता. नगरकर याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभुषणांची विक्री करणाऱ्या दालनाची जबाबदारी होती. 1 एप्रिल ते 26 मे 2025 या कालावधीत त्याने चार कोटी 58 लाख रुपयांचे दागिने चोरले. दालनातील दागिन्यांचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.
नगरकर याने दोन हजार 262 ग्रॅम वजनाच्या 180 वेढण्या, तसेच दोन हजार 426 ग्रॅम वजनाची 94 सुवर्ण नाणी (काॅईन) असा ऐवज चोरला असून, चोरलेल्या ऐवजाचे मूल्य एकूण मिळून चार कोटी 58 लाख रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.