पोलीस ठाण्यासमोर महिलेने पेटवून घेतले;अखेर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

शाळेतील कार्यक्रमादरम्यान डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावर संबंधित मुख्याध्यापकासह 15 जणांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी महिलेने वारंवार पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही शिरूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिरून पोलिसांनी तातडीने याप्रकरणी दखल घेऊन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश चौगुले, अभिषेक जाधव व इतर 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुमन सखाराम साळवे (वय 44, रा. बगाड रोड, रामलिंग, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 20 जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,20 जून 2024 रोजी रात्री साडेदहा वाजता सुमन साळवे यांच्या घराशेजारील इंग्रजी माध्यमाची ‘सेट जोसेफ’ शाळेत डीजेचा आवाज येत होता. त्यामुळे सुमन यांचा मुलगा जीवन सखाराम साळवे यांना यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात अडथळा येत होता. कर्कश आवाजासंदर्भात सुमन साळवे व जीवन साळवे यांनी शाळेच्या वॉचमनला विचारणा केली, तेव्हा वॉचमनने शाळेमध्ये फोन केल्यावर ‘तुम्हालाच आतमध्ये बोलावले आहे,’ असे सांगितले. दोघेही आतमध्ये गेल्यावर त्यांना 10 ते 15 महिला व पुरुष दारूच्या नशेत पार्टी करीत असल्याचे दिसून आले, तेव्हा साळवे यांनी त्या घटनेचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ केला व त्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानसी पायस यांना दाखविण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या. प्रिसिपल मॅडम नॅन्सी पायस व दोन महिलांचाही दारू पिल्यासारखा वास येत होता. दरम्यान, साळवी यांनी ज्ञानसी पायस यांना डीजेचा आवाज कमी करा, असे सांगितले.

‘तू कोण आहे’, असे म्हणत दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी सुमन साळवे यांना बेदम मारहाण केली. त्यांचा मोबाईल घेऊन मुलगा जीवन सखाराम साळवे यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर मुख्याध्यापिका यांनी साळवे यांच्यासह मुलाविरुध्द शिरूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्यामुळे तक्रादार सुमन साळवे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले तपास करीत आहेत.

सुमन साळवे यांच्यासह त्यांचा मुलगा अनाधिकाराने शाळेत आले होते. त्यांनी परवानगी न घेता व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करून शाळेत गोंधळ घातला. शिक्षकांवर धावून आले होते. शाळेतील शिक्षकाचा वाढदिवस साजरा करीत असताना संगीत लावले होते. डीजे लावला नव्हता. याबाबत आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल झाला असून, आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहोत.