पुणे : खडकवासला धरणात संततधार पाऊस, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

1019

गेल्या आठ दिवसात धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठा 18.31 टीएमसी झाला आहे. शहराची पिण्याच्या पाण्याची गरज पाहता वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध झाला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. संपूर्ण जुलै महिन्यातही धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शहरात पुन्हा पाणीकपात करण्याबाबतही गेल्या आठवड्यात चार ऑगस्ट रोजी जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात बैठक झाली होती. त्यानुसार उपलब्ध पाणी साठ्याची पुन्हा नव्याने नियोजन करण्यात येणार होते. मात्र तीन ऑगस्टच्या रात्री पासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या संततधार पाऊस अजून कायम आहे .त्यामुळे गेल्या आठ दिवसात पडलेल्या दमदार पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा झाला आहे.

खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी 11 ऑगस्ट अखेर 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणी साठा होता या वर्षी ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होत असून धरणातील पाणीसाठा जवळपास 63 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दर महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी लागते. खडकवासला प्रकल्पात सध्या 18 टीएमसीच्या वर पाणी आहे. त्यामुळे केवळ शहराला पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा प्रकल्पात सध्या उपलब्ध आहे. मात्र सिंचनासाठी देण्यात येणारे आवर्तन आणि इतर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज पाहता आणखी पाण्याची आवश्यकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या