पुण्यात उपमहापौरांच्या दालनात राडा; खुर्च्या फेकल्या, शर्ट फाडले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनातच कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन गटांत जोरदार हाणामारीत एका कार्यकर्त्याला शर्ट फाटेपर्यंत मारले. या प्रकारामुळे उपमहापौरांचे कार्यालयच आता हाणामारीचा अड्डा  बनले आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन येथील पुतळ्याजवळ महापालिकेने एकच मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र काही कार्यकर्त्यांनी लावलेले छोटे मंडप काढण्यात आल्याने ताडीवाला रस्ता परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. संबंधित कार्यकर्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे तक्रार घेऊन पोहोचले. उपमहापौरांच्या दालनात आधीच उपस्थित असलेल्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही इथे वाढीव करायला आलात का?’ असा सवाल करताच वातावरण चिघळले. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्या अंगावर फेकत मारामारी सुरू केली. या धक्कादायक प्रकारात एका कार्यकर्त्याला शर्ट फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱयांना महापालिकेत बोलावून घेतले. यामुळे परिसरात आणखी तणाव निर्माण झाला. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले.

दरम्यान, उशिरापर्यंत दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी उपमहापौरांच्या दालनात बैठक सुरू होती. या घटनेमुळे महापालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक मंडप महापालिकेने काढल्याने काही कार्यकर्ते ही तक्रार घेऊन माझ्याकडे आले होते. ताडीवाला रस्ता भागातील कार्यकर्ते होते. माझ्या दालनात बसलेल्या एकाने त्यांना काहीतरी बोलले. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. यापूर्वीचे काहीतरी वादाला कारण असू शकते. – परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे महापालिका