Pune News – कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भिती

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. यादरम्यान पूल कोसळल्याने 25 ते 30 पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, रेस्क्यू व्हॅन, फायर टेंडर बोट, एनडीआरएफ पथक आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.