कराडमध्ये जेवणासाठी थांबलेल्या बसमधील प्रवाशाला लुटलं, मारहाण करत 95 लाखांचं सोनं पळवलं

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणासाठी थांबलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण करत चार चोरट्यांनी रोकड आणि सोने पळवले. चोरी करून पलायन करत असताना जमावाने एका चोरट्याला पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले. तळबीड पोलीस पुढील तपास करत आहेत.

कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका परिसरात श्रावणी हॉटेलमध्ये बस जेवणासाठी थांबली होती. यावेळी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी बसमधील प्रवासी प्रशांत शिंदे यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोकड आणि सोने असलेली बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत 35 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असलेल्या लहान 20 डब्या होत्या. शिंदे कोल्हापूरहून हा माल घेऊन प्रवास करत होते.

बॅग हिसकावून चोरट्यांनी कारमधून साताऱ्याच्या दिशेने पलायन केले. मात्र एका चोरट्याला पकडण्यास जमावाला यश आले. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तळबीड पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रशांत शिंदे यांचा जबाबही नोंदवला जात आहे.