
>> राजाराम पवार
दिव्यांची रोषणाई, मिठाईचा आस्वाद अन् मित्रमंडळींचा सहवास हे दिवाळीचा आनंद द्विगुणित करतो. याबरोबरच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळीच साजरी होत नाही. मात्र, फटाक्यांमधील विषारी रसायने हवेत मिसळल्याने श्वसनाच्या समस्या निर्माण होणे, डोळ्यांची जळजळ होणे. त्वचेला अॅलर्जी होणे, यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उत्साहाचे वातावरण आहे. शहरात ठिकठिकाणी फटाके, आकाशकंदील, रांगोळीचे स्टॉ ल लागले आहेत. फटाक्यांमध्ये असलेले तांबे, कॅडमियम, सल्फर, अॅल्युमिनियम, बोरियमसारखे विषारी घटक हवेत धुलिकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका असतो फटाक्यांच्या धुरामुळे अस्थमाचा अटॅक, ब्रॉन्कायटिस, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच फुप्फुसांच्या विकारांमध्येही वाढ होऊ शकते. प्रामुख्याने दम्याच्या रुग्णांना आणि लहान मुलांना फटाक्यांतील दूषित वायूंचा अधिक धोका उद्भवू शकतो. तीव्र आवाजांच्या फटाक्यांमुळे पडद्यांना इजा कानाच्या होऊन श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांना गंभीर धोका उद्भवणे यांसारख्या गंभीर दुष्परिणामास सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर द्यावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होत असते. मात्र, फटाके फोडल्यानंतर त्यातून बिषारी वायू बाहेर पडातात. यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, खोकला, दमा, टीबीचा आजार असलेल्या रुग्णांना अधिकचा त्रास उद्भवू शकतो. फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुलांमध्ये काही काळासाठी बहिरेपणाची समस्या उद्भवण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. फटाक्यांमुळे मुलांचे हात भाजणे, आग लागणे यांसारख्या घटनाही घडण्याची शक्यता असते. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन दिवाळी साजरी केली पाहिजे.
डॉ. मिलिंद भोई, कान, नाक, घसा तज्ज्ञ
अशी घ्या काळजी
फटाक्यांच्या प्रदूषणामुळे होणारे धोके टाळण्यासाठी पर्यावरणपूरक सण साजरा करणे, फटाके न वाजवणे, कमी प्रदूषण करणारे फटाके वापरणे, फटाके फोडण्यासाठी मोकळ्या जागेचा वापर, फटाके फोडताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे, हृदयाच्या समस्या असणाऱ्यांनी फटाक्यांपासून दूर राहणे, घरात एअर प्युरिफायर वापरणे अशी काळजी घेतली पाहिजे.