सामोपचाराने करणार मंडळांतील वादाचे विसर्जन; मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्तालयात बैठक, निर्णयाची घोषणा लवकरच

फाईल फोटो

मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधीच मिरवणुकीत सहभागी होण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद सामोपचाराने सोडविण्यात येणार आहे. याबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच सर्व प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक आयोजित केली जाणार आहे. बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वय साधून तोडगा काढण्यावर एकमत झाले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, बाबू गेनू मंडळाचे बाळासाहेब मारणे, तसेच श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे हेही
उपस्थित होते. मानाचे आणि उर्वरित मध्यभागातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन स्वतंत्र बैठका पार पडल्या.

मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विसर्जन मिरवणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांत घेतली जाणार आहे. त्यानंतर मिरवणुकीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देणे ही मंडळांची प्रमुख भूमिका आहे, असे श्री कसबा गणणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.

एक मंडळ, एक ढोल पथक

लक्ष्मी रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी एका गणेश मंडळाला एकच ढोल-ताशा पथक लावण्याची परवानगी द्यावी. तसेच सकाळी सातपासून विसर्जन मिरवणूक सुरू करावी, अशा विविध मागण्या शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे केल्या.

मानाच्या मंडळांनंतर आम्हीच…

यंदा विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळाचा गणपती मिरवणुकीला मार्गस्थ होईल, असे अण्णा थोरात आणि पुनीत बालन यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ढोल पथकांची संख्याही मर्यादीत ठेवली जाणार असल्याचे बालन यांनी सांगितले.

मिरवणुकीतील ज्या पारंपरिक प्रथा आणि परंपरा आहेत, त्या अबाधित राहाव्यात, हीच आमची भूमिका आहे. सर्व मंडळे पोलिसांसाठी समान असून, निर्णयासाठी मंडळांनीच आपसात समन्वय साधावा. त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर