पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी; दासूण, मटारचे भाव तेजीत

पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये राज्यासह परराज्यांतून  गतआठवड्याच्या तुलनेने फळभाज्यांची आवक कमी झाली. मागणी वाढल्याने लसूण आणि मटारच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली होती. तर, इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे गेल्या आठवड्यातील भाव टिकून होते.

गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (25 रोजी) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची 10 ते 12, टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 8 ते10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश,तामीळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो,इंदूर 7 ते 8 टेम्पो गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंगा आणि मध्य प्रदेशातून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो इतकी आवक झाली होती. तर, स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून मटार 7 ते 8 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा सुमारे 90 ते 100 ट्रक, इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याची 45 ते 50 टेम्पो आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई, अंबाडी महाग गुलटेकडी मार्केटयार्डमधील तरकारी

विभागात पालेभाज्यांची आवक कमी झाली. परिणामी, कोथिंबीर, मेथी, शेपू, करडई आणि अंबाडीच्या भावात काहीशी वाढ झाली असून, अन्य पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डमधील घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली होती.

डाळिंब, लिंबू महाग, पेरू स्वस्त

पावसामुळे फळांच्या अवकेवरही परिणाम झाला. मागणी वाढल्याने डाळिंब, लिंबू, पपईच्या भावात वाढ झाली, तर आवक जास्त झाल्याने पेरूच्या भावात घसरण झाली होती. तर, इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते. मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी मोसंबी 50 ते 60 टन, संत्रा 2 ते 3 टन, डाळिंब 50 ते 60 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबांची सुमारे 1 हजार ते 1 हजार 300 गोणी, कलिंगड 2 ते 3 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरू 800 क्रेट्स, अननस 5 ट्रक, सीताफळ 20 ते 25 टन इतकी आवक झाली.

फुले महागली

फुले खरेदीसाठी बाजारात रविवारी गर्दी झाली. फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. गोकुळाष्टमी सोमवारी आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. फुले खरेदीसाठी मार्केटयार्डमधील घाऊक बाजारासह मंडईतील हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात फुले खरेदीसाठी गर्दी होती. पावसामुळे बाजारात भिजलेल्या फुलांचे प्रमाण अधिक आहे. सुक्या फुलांना चांगली मागणी असून, फुलांच्या दरात वाढ झाल्याची माहिती फुलांचे आडतदार सागर भोसले यांनी दिली.

मटण, मासळीचे दर स्थिर

श्रावण महिना सुरू असल्याने गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक कमी होत आहे. सद्यः स्थितीत घरगुती ग्राहकांकडून कमी, तर हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी आहे. त्यामुळे गतआठवड्यातील मासळीचे कमी झालेले दर कायम आहेत. तर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने चिकनच्या भावात किलोमागे 10 रुपये, तर गावरान अंड्यांच्या भावात शेकडामागे 20 रुपयांनी वाढ झाली. मटणाचे दर स्थिर होते. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी 5 ते 10 टन, खाडीच्या मासळीची 200 ते 300 किलो आणि नदीच्या मासळीची 400 ते 500 किलो इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी, चिकन अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.