
‘आठ महिने झाले, आमचे पगार नाहीत. डॉक्टरांचे पगार केले जात आहेत. डॉक्टर काम करतात, आम्ही काम करत नाही का? आठ ते नऊ महिने झाले, पगार नाही, तरीही आम्ही रुग्णांसाठी समर्पित सेवा दिली. मात्र, आमचा पगारच दिला जात नसेल, तर आम्ही आमचे घर, मुलांचे शिक्षण हे सर्व चालवायचे कसे? काम करूनही आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,’ अशा उद्विग्न व्यथा नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी मांडल्या.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे नन्हे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मादाय जनरल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी हॉस्पिटलसमोर ठिय्या आंदोलन केले. जवळपास 1300 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,’ अशी तीव्र भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्ड बॉ य, क्लार्क, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक असे जवळपास चार हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार वेळोवेळी केले जातात. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून दिले जात नाहीत, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
15 वर्षांत एकदाही सलग दरमहिन्याला पगार झाला नाही
‘मी गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी काम करत आहे. या 15 वर्षांच्या कालावधीत एकही वर्ष असे गेले नाही की, सलग दरमहिन्याला पगार झाला आहे. अशा परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. दरवेळी प्रशासनाकडून तुमचा पगार थकीत ठेवणार नाही, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्येक वेळी तीन ते चार महिन्यांचा पगार थकीत ठेवला जातो. हॉस्पिटल प्रशासनाने प्रत्येक महिन्याला नाही, पण किमान दोन महिन्यांतून एकदा तरी आमचा पगार द्यावा,’ अशी उद्विग्नता एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केली.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत, ही गोष्ट खरी आहे. मी संचालकांच्या कानावर ही गोष्ट घातली असून त्यांचे व्यवस्थापन विभागाशी याबाबत बोलणे सुरू आहे.
डॉ. क्रिश्नकांत पाटील, अधिष्ठाता, काशीबाई नवले हॉस्पिटल